मुंबई : क्रीडा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी आज मुंबईत एका नव्या भागिदारीचा शुभारंभ केला. केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबोल यांनी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत या भागिदारीची घोषणा केली. या भागिदारीमुळे ॲथलिट आणि प्रशिक्षक प्रशिक्षण आणि विकास, क्रीडा विज्ञान क्रीडा प्रशासन आणि एकात्मता तसेच तळागाळातून सहभाग या क्षेत्रातील सहकार्य वृध्दींगत होणार आहे.
यावेळी बोलतांना क्रीडा मंत्री विजय गोयल म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात आम्हाला ऑस्ट्रेलियासह बरेच काही शिकून घ्यायचे आहे. भारत-ऑस्ट्रेलिया क्रीडा भागीदारीमुळे दोन्ही देशांमधील ॲथलिट, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी तसेच क्रीडा वैज्ञानिकांचे अदान प्रदान होऊ शकेल.
भारताने क्रीडा क्षेत्राकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. तळागाळातील स्तरापर्यंत क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी ‘खेलो इंडिया’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. शाळांमध्येही क्रीडा विषय अनिवार्य करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले.
लवकरच राष्ट्रीय क्रीडा कौशल्य परिचय आणि विकास पोर्टलचे उद्घाटन होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या नव्या भागिदारीअंतर्गत भारतात ऑस्ट्रेलियन क्रीडा संस्थेच्या धर्तीवर राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी व्हिक्टोरिया विद्यापीठ आणि कॅनबेरा विद्यापीठ भारतासोबत सक्रीय राहतील, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबोल यांनी सांगितले.
टर्नबोल आणि गोयल यांनी यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि अपनालय या संस्थेत क्रीडा प्रशिक्षण घेणाऱ्या युवा मुलींची भेट घेतली. सचिन तेंडुलकर यांच्या पत्नीच्या आई ॲनाबेल मेहता, अपनालयासोबत कार्यरत आहेत. खेळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे भांडवल वाढते, असे वक्तव्य करत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
आपल्या चार दिवसीय दौऱ्याचा समारोप करताना टर्नबोल म्हणाले की, आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येत असलेला भारत देश आता महत्त्वपूर्ण क्षेत्र झाला आहे. अर्थकारण, क्रीडा, आरोग्य, विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध अधिक दृढ करणे हा आपल्या भारत भेटीमागचा उद्देश होता, असे ते म्हणाले.