मुंबई : चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे झालेल्या जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने या संबंधी काढलेल्या शासन निर्णयानुसार, दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकास देण्यात आले आहेत.
दि. 2 जुलै रोजी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून जिवित व वित्त हानी झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत.
तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, मालगुजारी तलाव व इतर तत्सम तलावांबाबतीत भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाय योजना सुचविणे ही या चौकशी पथकाची कार्यकक्षा असणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य शासनाने आज काढला आहे.