मुंबई : सध्याच्या काळात शाश्वत ऊर्जेसाठी सौर ऊर्जेचा वापर होणे आवश्यक आहे. कला व संस्कृती क्षेत्रातील संस्थांनी अशा समाजोपयोगी उपक्रमात पुढाकार घेणे ही आनंदाची गोष्ट आहे. या पूर्वी आपण विजेचा फक्त वापरच करत होतो. मात्र आता ऊर्जा संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नरिमन पॉईंट येथील राष्ट्रीय ललित कला केंद्राच्या (एनसीपीए) छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्याच्या काळात शाश्वत ऊर्जेसाठी सौर ऊर्जेचा वापर होणे आवश्यक आहे. कला व संस्कृती क्षेत्रातील संस्थेने अशा समाजोपयोगी उपक्रमात पुढाकार घेणे ही आनंदाची गोष्ट आहे. या पूर्वी आपण विजेचा फक्त वापरच करत होतो. मात्र आता ऊर्जा संवर्धन करणे ही काळाची आवश्यकता बनली आहे. सध्या आपण कोळशावर आधारित अस्वच्छ ऊर्जेचा वापर करत आहोत. त्या ऐवजी आता स्वच्छ ऊर्जा वापरण्यासाठी नवनविनिकरण ऊर्जेचा उपयोग वाढवायला हवा. सौर ऊर्जा क्षेत्रात आता आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असून त्याचा उपयोग या ऊर्जेच्या वापरासाठी करावा. राज्य सरकारने कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात चार हजार ठिकाणी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
एनसीपीएच्या छतावर बसविलेला 450 केव्ही क्षमतेच्या या प्रकल्पातून महिन्याला सुमारे 50 हजार युनिट वीज निर्मिती होणार असल्याचे एनसीपीएचे अध्यक्ष खुश्रु सुंतूक यांनी यावेळी सांगितले.