-अमित त्रिवेदी यांनी लिहिलेले, संगीतबद्ध केलेले, त्यांच्याद्वारे निर्मित आणि त्यांनीच स्वरबद्ध केलेले हे प्रेरणादायी गीत आशा गीत बनावे ही यामागची संकल्पना असून भारतभरातील कॅन्सर योद्ध्यांचे साहस आणि दृढ निर्धाराच्या सन्मानार्थ हे गीत तयार करण्यात आले आहे.
- एका तरुण मुलाने हाडांच्या कर्करोगाशी दिलेला लढा आणि त्यामध्ये मिळवलेले यश हा संपूर्ण प्रवास या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे.
मुंबई, २५ ऑक्टोबर २०२१: ‘कर्करोग, कॅन्सर‘ हे शब्द जरी ऐकले तरी पहिल्यांदा मनात उत्पन्न होतात भीती, अनिश्चितता आणि त्रास या दुःखदायक भावना! पण कर्करोगाशी लढा देण्याच्या वाटचालीमध्ये साहस, दृढ निर्धार, सकारात्मकता यांचा देखील समावेश आणि त्यांचा सन्मान आवर्जून झाला पाहिजे.
सकारात्मकतेचा प्रसार व्हावा, कर्करोग पीडितांचा उत्साह वाढवला जावा, त्यांच्या निर्भयतेचे कौतुक व्हावे यासाठी भारतातील पहिली स्वयंसेवी व विना-नफा तत्त्वावर चालवली जाणारी संघटना इंडियन कॅन्सर सोसायटीने प्रसिद्ध संगीतज्ञ अमित त्रिवेदी यांच्या सहयोगाने एक प्रेरणादायी गीत आज प्रकाशित केले – ‘मैं लड़ लूंगा‘. व्हर्च्युअली पार पडलेल्या या प्रकाशन कार्यक्रमामध्ये कर्करोगातून सुखरूप बाहेर पडलेल्या अनेक व्यक्ती, ऑन्कोलॉजिस्ट्स आणि इंडियन कॅन्सर सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
इंडियन कॅन्सर सोसायटी आणि संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी यांनी एकत्र मिळून हा उपक्रम राबवला आहे. कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेल्या अनेक व्यक्तींच्या यशोगाथांचा सन्मान करून त्यातील नेमके सार सर्वांसमोर ठेवणारे हे गीत आहे. ‘मैं लड़ लूंगा‘ ही एका तरुण मुलाची गोष्ट आहे, कर्करोग आणि त्यामुळे शरीराचे काही भाग काढून टाकावे लागले असून देखील चालायला शिकण्याची जिद्द त्याच्यामध्ये अतिशय प्रबळ आहे. व्हिडिओची सांगता एका हृदयस्पर्शी संदेशाने करण्यात आली आहे, मेहनत आणि दृढ निर्धाराने पर्वत देखील हलवले जाऊ शकतात हा संदेश त्या तरुण मुलाच्या कृतींमधून प्रतीकात्मकरित्या दर्शवण्यात आला आहे.
यावेळी इंडियन कॅन्सर सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. नवीन क्षत्रिय यांनी सांगितले, “या उपक्रमासाठी नामवंत संगीत दिग्दर्शक, गायक अमित त्रिवेदी यांच्यासोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कॅन्सर रुग्णांना जे साहाय्य आणि जी देखभाल पुरवण्याचे लक्ष्य इंडियन कॅन्सर सोसायटीने ठरवले आहे त्याचे हे फलित आहे असे आम्ही मानतो. रुग्णांमध्ये दिसून येणारी आशा आणि निर्भयता यांचा हा विशेष संदेश आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला आशा वाटते की, या गीतामुळे भारतभरातील कॅन्सर रुग्णांना आणि कॅन्सरनंतरचे आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या साहस वाटचालीत मोलाची मदत मिळेल, या वाटचालीत प्रत्येक पावलावर आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे आमचे वचन आहे.”
इंडियन कॅन्सर सोसायटीसोबत आपल्या सहयोगाबाबत संगीत दिग्दर्शक आणि गायक अमित त्रिवेदी म्हणाले, “इतक्या चांगल्या उपक्रमासाठी इंडियन कॅन्सर सोसायटीसोबत सहयोग करताना मला अतिशय आनंद होतोय, शिवाय खूप अभिमान देखील वाटतोय. ‘मैं लड़ लूंगा‘ हे गीत कर्करोगानंतरचे आयुष्य जगत असलेल्या सर्व व्यक्तींना समर्पित आहे, ज्यांनी आशा कधीही सोडली नाही आणि स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू दिला नाही. मला खात्री आहे की या व्हिडिओमुळे अनेक कॅन्सर रुग्णांना त्यांच्या सध्या सुरु असलेल्या आजाराविरोधातील लढ्यामध्ये मदत आणि प्रेरणा मिळेल.”
इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्सवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे –
https://www.youtube.com/watch?v=kQbavhGhfkE
कर्करोगाला प्रतिबंध कसा करावा आणि हा आजार लवकरात लवकर लक्षात यावा यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी इंडियन कॅन्सर सोसायटी अनेक नवनवीन उपक्रम हाती घेत असते. त्यांच्या एका नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या एका उपक्रमामध्ये सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे या कलाकारांनी कॅन्सर रुग्णांना नव्या सर्वसामान्य स्थितीमध्ये (अनलॉक काळ) आपले उपचार सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
इंडियन कॅन्सर सोसायटी
१९५१ साली डॉ. डीजे जुसावाला आणि श्री. नवल टाटा यांनी कर्करोगासाठी विना नफा तत्त्वावर चालवली जाणारी भारतातील पहिली संघटना म्हणून इंडियन कॅन्सर सोसायटीची स्थापना केली. कर्करोगासाठीची देखभाल, त्याबाबतची जागरूकता, आजार लवकरात लवकर लक्षात यावा म्हणून तपासणी, उपचारांसाठी आर्थिक मदत, सहायता गट, कर्करोगानंतरचे आयुष्य जगत असलेल्यांचे पुनर्वसन, वैद्यकीय संशोधन, शिक्षण, नोंदणी या सर्वांचा समावेश इंडियन कॅन्सर सोसायटीच्या उपक्रमांमध्ये होतो.















