मुंबई : राज्य शासनाच्या ‘स्पर्श’ (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) प्रकल्पांतर्गत राज्यातील 1269 शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या असून त्यामुळे 1 एप्रिलपर्यंत सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी झाला आहे. तसेच वीज बिलापोटीच्या 92.68 लाख रुपयांची बचत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतींमधील दोन लाख ट्यूबलाईट, 75 हजार पंखे व 1600 वातानुकुलित यंत्रे बदलण्यात आली आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील शासकीय इमारतींमधील जुनी विद्युत उपकरणे बदलून ऊर्जा सक्षम उपकरणे बसविण्याचा ‘स्पर्श’ हा उपक्रम राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व शासकीय अनिवासी इमारतींमधील जुनी ट्यूबलाईट, पंखे, वातानुकुलित यंत्रे बदलून ऊर्जा बचत करणारी नवीन उपकरणे बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत 1269 शासकीय इमारतींमधील जुनी ट्यूबलाईट, पंखे, वातानुकुलित यंत्रे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम केल्यामुळे सुमारे 9.95 लाख युनिट्स विजेची बचत झाली असून वीज बिलातही सुमारे 92.68 लाख रुपयांची बचत झाली आहे. स्पर्श उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व शासकीय इमारतींच्या छतांवर व परिसरातील मोकळ्या जागेत सौर ऊर्जा निर्मितीची सयंत्रे बसविण्यात येणार असून त्यामार्फत राज्य शासनाच्या इमारतींमध्ये सौर विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेमार्फत राज्य शासनाच्या सर्व इमारतींमधील विद्युत संच मांडणी व विद्युत उपकरणे यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. इमारतींमधील या उपकरणांच्या वीज शुल्क संबंधित वापरकर्त्या विभागामार्फत करण्यात येते. परंतु इमारतींमधील अनेक उपकरणे ही जुनी असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही उपकरणे बदलण्यासाठी ‘स्पर्श’ हा उपक्रम हाती घेतला. यासाठी केंद्र शासनच्या ‘ईईएसएल’ या कंपनीबरोबर सहकार्य करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या ‘ईईएसएल’ कंपनी यांच्यात 24 ऑक्टोबर 2017 रोजी करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सुमारे 307 कोटी रु. एवढी भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. वीज बिलाच्या बचतीमधून सुमारे 70 टक्के भाग हा ईईएसएल कंपनीस दर त्रैमासिकास टप्प्याटप्प्याने परत करण्यात येणार आहेत. ही परतफेड ही 20 टप्प्यांमध्ये म्हणजेच पुढील पाच वर्षात करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात ही कंपनी बदललेल्या वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीही करणार असल्यामुळे राज्य शासनाच्या विद्युत उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीवर होणारा खर्चही वाचणार आहे.‘स्पर्श’ प्रकल्प एकूण दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण राज्यातील शासनाच्या अनिवासी इमारतीमधील सुमारे 5.15 लाख ट्यूब लाईट व दिवे, सुमारे 2.50 लाख पंखे, सुमारे 25 हजार वातानुकुलित यंत्रे व इमारतीच्या परिसरातील पथदिवे इत्यादी जुनी उपकरणे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविण्यात येणार आहेत. आतापर्यंत त्यातील राज्य शासनाच्या सुमारे 1269 इमारतीमधील कामे पूर्ण झाली असून त्यामधील सुमारे 2.16 लाख ट्यूब लाईट व दिवे, 74 हजार 594 पंखे, 1670 वातानुकूलित यंत्रे बदलण्यात आली आहेत.