मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समित्या गठीत केल्या आहेत. या वेगवेगळ्या पाच समित्यांनी प्रकाशित केलेले साहित्य सर्व जगाला मार्गदर्शक ठरणारे असल्याने या साहित्याचे डिजिटायझेशन करुन हे साहित्य जनतेपर्यंत संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या प्रकल्पासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत काम सुरु झाले असून यासाठी केपीएमजी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस कंपनीकडे काम सोपविण्यात आले असून निविदा मंजुरीनंतरची प्रकल्प अंमलबजावणीबाबतची कामे सध्या सुरु आहेत.महाराष्ट्राला थोर राष्ट्रीय पुरुषांचा वारसा असून त्यांच्या कार्याची ओळख महाराष्ट्रातील जनतेला व्हावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत यापूर्वीच थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी एकूण ५ समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. या समित्यामार्फत तयार करण्यात आलेले वेगवेगळे खंड राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्यात येतात. तसेच सदर ग्रंथ सर्व विद्यापीठे/महाविद्यालये व शासकीय ग्रंथालये यांच्या ग्रंथालयात वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वेगवेगळया 5 समित्याअंतर्गत वेगवेगळे साहित्य प्रकाशित करण्यात येत आहे. मुळातच थोर व्यक्तिमत्वांची माहिती वाचकांना व्हावी, त्यांनी केलेले कार्य वाचकांसमोर यावे तसेच हे साहित्य आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी ही सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील इतिहासाचे जतन करुन ठेवणे, थोर पुरुष आणि त्यांच्या कार्याची ओळख समाजासमोर पुस्तकरुपात ठेवणे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत.