मुंबई : भारत आणि थायलंड देशामध्ये अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध असून येत्या काळात लघु व मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी महाराष्ट्र आणि थायलंडने परस्पर सहकार्य वाढवावे, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. थायलंड येथील जनरल कौन्सिल तसेच उद्योजकांचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आहे. गुरुवारी शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे लघु व मध्यम उद्योगावर चर्चा केली. यावेळी कौन्सिल जनरल एकापोल पूलपिटा, डॉ. विमोनकोर्न कोसमस (डेप्युटी जनरल कौन्सिल), वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रमुख विजय कलंत्री आदी उपस्थित होते. यावेळी अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग विषयावर थायलंडच्या शिष्टमंडळाने सादरीकरण केले. महाराष्ट्रात उद्योग वाढीला मोठी संधी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. छोटे व मध्यम उद्योग वाढीमध्ये थायलंडचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात या क्षेत्रात दोन्ही देशांनी काम करण्याची तयारी दर्शवली. यावर्षी थायलंडमध्ये होणाऱ्या ट्रेड फेअरसाठी महाराष्ट्राला आमंत्रित करण्यात आले. लघु व मध्यम उद्योगावर चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, लघु व मध्यम उद्योग हा उद्योगक्षेत्राचा कणा आहे. रोजगार निर्मितीमध्ये लघु व मध्यम उद्योगाचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन या क्षेत्राला चालना देत असून या क्षेत्रासाठी विशेष धोरण राबवले जात आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी 30 टक्के निर्यात ही राज्यातून होते. राज्यातील ५० टक्के रोजगार हा लघु व मध्यम उद्योगांमधून तयार होतो. यासाठीच राज्य लघु व मध्यम उद्योगावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यांच्यासाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्रात देश-विदेशातील गुंतवणूक वाढत आहे. परकीय गुंतवणुकीपैकी पन्नास टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे, भाजीपाला, अन्नपदार्थाचे उत्पादन घेतले जाते. आंबा, संत्रा आदी फळे महाराष्ट्राची ओळख आहेत. या पदार्थावर प्रक्रिया करून त्या उत्पादनाची निर्यात करण्यावर भर दिला जात आहे. यासोबत डेअरी क्षेत्रातदेखील महाराष्ट्राची कामगिरी भरीव अशी आहे. दुधावर प्रक्रिया करण्याचा उद्योग वाढवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असले, तरी थायलंडने या क्षेत्रात आपले योगदान देण्याची गरज श्री. देसाई यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यापासून दर्जेदार कापड करण्यासाठी राज्य सरकारने विविध ठिकाणी नऊ टेक्सटाइल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी हे पार्क सुरू झाले आहेत. आय टी क्षेत्रातही राज्याचे काम उल्लेखनीय आहे. थायलंड आणि भारत यांच्यातील परस्पर संबंधांसोबत उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यावर भर देण्याची यावेळी तयारी दर्शवली. थायलंड येथे होणाऱ्या ट्रेड फेअरमध्ये महाराष्ट्राचा सहभाग असेल, असे आश्वासन उद्योगमंत्री यांनी यावेळी दिले.