नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातच पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. येचूरी हे पत्रकार परिषदेत घेत असताना हा प्रकार घडला. ते कार्यालयात येत असताना दोन जण त्यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पक्षाच्या पॉलीट ब्युरोची दोन दिवसीय बैठक पार पडली. त्यासंबंधी माहिती देण्यासाठी येचुरी यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. हल्लेखोरांच्या मारहाणीत येचूरींना किरकोळ दुखापत झाली. हल्लेखोर हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचे समजते. येचूरींवर हल्ला होताच माकपच्या सतर्क कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.
पक्षाच्या पॉलीट ब्युरोने या घटनेचा निषेध केला आहे. रा. स्व. संघाकडून विरोधी पक्षाला धमकावण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही तो सफल होऊ देणार नाही, असा आरोप माकपने केला आहे.