केंद्र सरकार आणि पालिकेच्या समनव्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांचा पुढाकार
मुंबई, ता. 18: मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सायन किल्ल्याच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून यासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील समन्वयासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. यासंदर्भात खासदार शेवाळे यांनी नुकताच सायन किल्ल्याचा पाहणी दौरा केला. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक श्री राजेंद्र यादव, नगरसेवक विभागप्रमुख श्री मंगेश सातामकर, नगरसेवक श्री रामदास कांबळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री गजानन बेल्लाळे, सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोज हीर्लेकर, विधानसभा संघटक अविनाश राणे, निमिष भोसले आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सायन किल्ला गेल्या काही काळापासून संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. या किल्ल्याच्या खालच्या बाजूस असलेले उद्यान पुरातत्व विभागाकडून मुंबई महानगरपालिकेला भाडेतत्त्वावर देण्यात आले असून या उद्यानाची देखभाल पालिकेकडून केली जाते. हा भाडेकरार पुढच्या वर्षी संपुष्टात येणार असून तो वाढविण्यासाठी पालिकेने पुरातत्व विभागाकडे विनंती केली आहे. तसेच या उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात येणारा आराखडा लवकरच पूर्ण होणार असून पुरातत्व विभागाच्या परवानगी नंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून उद्यानाची डागडुजी, संरक्षक भिंत, इतिहासाची माहिती देणारे फलक, दिवाबत्ती, वाचनालय, सुरक्षा व्यवस्था, वरिष्ठ नागरिकांसाठी बेंचेस, प्रसाधन गृह यांसह अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
पुरातत्व विभागाकडून देखील किल्ल्याच्या इतर भागाचे संवर्धन आणि जतन यासाठी आराखडा तयार केला जात असून यात किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी, ऐतिहासिक माहिती देणारे फलक, ऐतिहासिक वास्तूंचे अद्ययावत संवर्धन अशा बाबींचा समावेश असेल.
सायन किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुंबई महानगर पालिका आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या वतीने स्वतंत्ररीत्या आराखडे तयार केले जात असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. याविषयी, पालिका आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक येत्या आठवड्यात मी आयोजित केली आहे. या बैठकीत स्थानिक पोलीस आणि किल्ल्यावर मॉर्निग वॉक साठी येणाऱ्या वरिष्ठ नागरिकांच्या फोरम मधील प्रतिनिधींच्या सुचनांचाही आढावा घेतला जाईल. दोन्ही प्राधिकरणाच्या समन्वयातून सायन किल्ल्याला लवकरात लवकर त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करेन.
– खासदार राहुल शेवाळे