मुंबई : पालिकेच्या सायन रुग्णालयात कपड्यांअभावी शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता प्रसुतीगृहात झुरळांचा उपद्रव वाढल्याने तान्ह्या बाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा एैरणीवर आला आहे. नगरसेवकांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. तसेच आरोग्य विभागाच्या या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जातो आहे. अखेर येत्या २४ तासांत पेस्ट कंट्रोल करण्याचे आश्वासन पालिकेने दिले.
काही दिवसांपूर्वी सायन रुग्णायत रुग्णांचे लॉन्ड्रीमधून कपडे धुवून न आल्यामुळे ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता याच रुग्णालयाच्या प्रसुतीगृहात जेथे लहान अर्भक जन्म घेतात तेथे चक्क झुरळ्यांचा उपद्रव वाढले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पेस्ट कंट्रोल यंत्रणा आहे, मात्र या विभागाच्या शेड्युल्डमध्ये झुरळ्यांवर पेस्ट कंट्रोल करण्याचे नसल्याने यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र झुरळ्यांचा उपद्रव वाढला असताना त्यावर खासगी कंत्राटदाराकडून पेस्टकंट्रोल करून घेण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे झुरळ्यांचा उपद्रव वाढल्याने या विभागात जन्म घेणाऱ्या छोट्या अर्भकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एैरणीवर आला. झुरळ्यामुळे छोट्या बाळांना संसर्ग होण्याची भीती आहे. असे असताना खासगी पेस्टकंटोल करुन न घेता केवळ झुरळ्यांवर पेस्ट कंट्रोल करण्याचे शेड्युल्डमध्ये (यादीत) नसल्याने दुर्लक्ष केले. याबाबत बुधवारी पालिकेच्या आरोग्य समितीत जोरदार पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी बुधवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले. या हरकतीच्या मुद्दयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या हलगर्जीपणावर जाब विचारल्यानंतर प्रशासनाने आपली बाजू सावरत येत्या २४ तासांत येथील रुग्णांना शिफ्ट करुन या विभागाचे पेस्टकंट्रोल करून घेतले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.