
नवी दिल्ली : कोकणवासीयांची विमानतळाची मागणी यंदाच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रत्यक्षात येत आहे. सिंधुदुर्ग विमानतळावर उद्या परीक्षण तत्वावरील पहिले विमान उतरणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक तसेच वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी या विमानतळासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश आले आहे. परीक्षण तत्वावरील पहिले विमान श्रीगणेशाच्या मंगल मूर्तीसह उद्या सकाळी 11 च्या सुमारास सिंधुदुर्गातील पारूळे चिपी विमानतळावर प्रथमच उतरेल. उद्या विमानाचे परीक्षण उड्डाण होत असून त्यात वैमानिकांसह केबीन क्रू असेल. विमानतळा संदर्भातील अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येथून लवकरच नियमित प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
या विमानतळाबाबतच्या साऱ्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या परीक्षण विमानोड्डाणामुळे सिंधुदुर्गवासीयांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली असून त्यांना गणेशोत्सवाच्या सणाची खरीखुरी भेट मिळाली आहे, असे प्रभू यांनी नमूद केले. या विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबाबत असलेले अन्य प्रलंबित मुददे मार्गी लावण्यासाठी विमानतळ व्यवस्थापन समिती व राज्य सरकारने चर्चेने तातडीने मार्ग काढावा अशा सूचना प्रभू यांनी दिल्या आहेत. या विमानतळावरून नियमित विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. मात्र प्रवाशांची सुरक्षा सर्वोपरी असून त्याच्याशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही असेही प्रभू यांनी आवर्जून नमूद केले.
सिंधुदुर्ग विमानतळाबाबत आवश्यक ते ओएलएस सर्वेक्षण झाले असून विमानतळावरील 2500 मीटर्स लांबीच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. तीन वाहनतळांची उपलब्धता येथे असेल. 400 प्रवासी संख्येच्या क्षमतेची विमानतळ इमारत तयार आहे. तसेच एटीसी टॉवरचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आयएलएस व व्हीओआर यंत्रणांचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना प्रभू यांनी विमानतळ व्यवस्थापन कंपनीला दिल्या आहेत.
प्रभू यांनी सांगितले की नरेंद्र मोदी सरकारच्या “उडान’ (उडे देश का आम नागरिक) या छोटी शहरे विमानसेवेने जोडण्याच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत कोकणवासीयांची विमानतळाची प्रदीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे. या योजनेमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे परवडणाऱ्या दरात विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेमुळे देशांतर्गत सर्वसमावेशक आर्थिक विकासाबरोबरच रोजगार वृध्दीला प्रोत्साहन मिळेल व लहान शहरातील विमानसेवेसाठीच्या पायाभूत सुविधांचीही यामुळे पूर्तता होईल. सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळांचे काम मार्गी लागल्यामुळे केवळ महाराष्ट्रातील कोकण विभाग हवाई मार्गाने उर्वरीत देशाबरोबर जोडला जाण्याबरोबरच या भागातील पर्यटन व्यवसायालाही हातभार लागणार आहे. कोकणात अन्य दोन विमानतळांचे काम वेगाने सुरू असून उत्तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र व गोव्याच्या बहुतांश भागाबरोबर हवाई मार्गाने थेट जोडण्याचा उद्देश पूर्ण होईल, असेही प्रभू यांनी सांगितले.
















