नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या परुळेचिपी विमानतळावर आज मुंबईहून आलेले विमान यशस्वीरित्या उतरले. या यशस्वी चाचणीबरोबरच देशवासियांना कोकणात हवाईमार्गाने येणे सुलभ होणार आहे. व्यावसायिक विमानांचे उड्डाण यावर्षीच्या डिसेंबरपासून सुरू होईल.
मालवण आणि वेंगुर्ल्याच्यामध्ये हा विमानतळ असून तारकर्ली किनारा आणि सिंधुदुर्ग किल्ला या स्थानापासून 20 किलोमीटरवर आहे. या विमानतळावरुन उड्डाण सुरू झालयानंतर उत्तर गोव्यातील पर्यटनही सुलभ होणार आहे. तिराकोल, आरामबोल आणि मांद्रेम किनाऱ्यांचे अंतर गोव्याच्या दाबोलिम विमानतळाच्या अंतराएवढेच आहे.
2500 मीटर्सच्या धावपट्टीमुळे एअरबस ए 320 आणि बोईंग 735 सारखी विमानेही या विमानतळावर उतरू शकतील. विमानतळाच्या इमारतीची क्षमता 400 प्रवाशांएवढी आहे.
आयएलएस इन्स्टॉलेशन आणि व्हीओआर इन्स्टॉलेशनशी संबंधित मुद्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे निर्देश, नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी विमानतळ व्यवस्थापन कंपनी आणि राज्य सरकारला दिले आहेत. जेणेकरून नियमित कार्यान्वयन योजल्यानुसार सुरू होऊ शकेल. विमानाची सहवैमानिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमधील स्थानिक होती.