मुंबई, विशेष प्रतिनिधी:- ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दिवा स्टेशन परिसराला फेरीवाल्यांनी वेढा घातला. वाहतूक कोंडीत भर पडत असून पादचाऱ्यांना येथून ये- जा करताना दिव्य संकटाचा सामना करावा लागतो. प्रशासनाने पर्यायी जागेत फेरीवाल्यांची व्यवस्था करून परिसर फेरीवाला मुक्त करावा, अन्यथा महापालिकेसमोर धरणे आंदोलनाचा भाजपचे ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.
मोकळ्या दिसणाऱ्या जागांवर वाटेल तेथे व्यवसाय थाटतात. रस्त्यावर चालताना यावेळी कसरत करावी लागते. दिवा रेल्वे स्टेशन परिसरात पूर्वेकडेही रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. फुटपाथ देखील अतिक्रमित केल्याने नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते. रस्ते, पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करून देण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे फेरीवाल्यांकडून कब्जा सुरू आहे. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असते. अनेकांना अपघाताचे प्रकार देखील घडले आहेत. पालिका प्रशासनाने नियमानुसार दिवा स्टेशन परिसरातील रस्ते मोकळे करून येथील वाहतूक कोंडी टाळायला हवी अशी मागणी, मुंडे यांनी केली आहे. पालिकेने फेरीवाला मुक्त परिसर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा महापालिका कार्यालया बाहेर धरणे आंदोलन करू असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
नगरसेवक अपयशी
फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढण्यास दिवा परिसरातील नगरसेवक कारणीभूत आहेत. नागरिकांना यामुळेच त्रास सहन करावा लागतो असल्याची टीका रोहिदास मुंडे यांनी केली आहे
राखीव जागा उपलब्ध करा
फेरीवाल्यांसाठी दिवा शहरात राखीव जागा उपलब्ध द्याव्यात. या ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी अथवा बाजार भरविण्यात यावा, नागरिकांसाठी असणारे रस्ते मोकळे ठेवावेत अशी भूमिका मुंडे यांनी मांडली आहे.