मराठी सिनेइंडस्ट्रीचा देखणा हिरो सिद्धार्थ चांदेकरनं नुकताच आपला २६ वा वाढदिवस साजरा केला. छोटा पडदा तसेच मराठीतील दर्जेदार चित्रपटांमधून नावारूपास आलेल्या सिद्धार्थचा आगामी ‘बसस्टॉप’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्या निमित्ताने या सिनेमाच्या संपूर्ण टीमने सिद्धार्थचा वाढदिवस साजरा केला.
गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाची मराठी रॅपर किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव याने निर्मिती केली असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांचीदेखील यात महत्वाची भूमिका आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. गतवर्षाचे राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. शिवाय तरुणांचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी संगीत दिले आहे. ‘बसस्टॉप’ हा सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.