मुंबई: ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ या भारतातील ‘सर्वोत्तम कामगिरी’ करणाऱ्या, ‘महारत्न’ म्हणून गौरविण्यात येणाऱ्या आणि ऊर्जा क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या विपणन विभागाच्या संचालकपदी सुखमल जैन यांची नियुक्ती झाली आहे. कंपनीतर्फे नुकतीच ही घोषणा करण्यात आली.
पदोन्नती होऊन संचालक मंडळात सहभागी होण्यापूर्वी जैन हे कॉर्पोरेट कार्यालयात कार्यकारी संचालक प्रभारी (मार्केटिंग कॉर्पोरेट) या पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते गॅस व्यवसाय युनिटचे प्रमुख होते.
‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि त्यानंतर ‘एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च’मधून एमबीए ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले सुखमल जैन यांनी बीपीसीएल कंपनीमधील आपल्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत रिटेल, एलपीजी आणि गॅस या विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत.
तीन दशकांहून अधिक काळातील आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, जैन यांनी एलपीजी व्यवसायात ‘गिव्ह इट अप’ मोहीम आणि ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ यांसारख्या उद्योग परिभाषित उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घेतला. तसेच किरकोळ व्यवसायातील धोरण आणि निष्ठा कार्यक्रम यशस्वीपणे राबविले.
सुखमल जैन हे ‘गोवा नॅचरल गॅस प्रा. लि.’चे (जीएनजीपीएल) अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते ‘सेंट्रल यूपी गॅस लिमिटेड’चे (सीयूजीएल) अध्यक्ष होते, तसेच ‘बीपीसीएल’ची पूर्ण मालकीची उपकंपनी, ‘बीपीसीएल’मध्ये विलीन झालेली ‘भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड’ हिचेही (बीजीआरएल) ते संचालक होते.
जैन यांच्या नेतृत्वाखाली ‘गॅस बीयू’ने भारताला गॅस-आधारित अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला पाठबळ देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यातून देशाला व्यापक आर्थिक समृद्धी मिळाली, तसेच देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात योगदान मिळाले.