लेखक : रुपेश पाटील
पावसाळा सुरु झाला की पुण्या मुंबईतील लोक एक दिवसीय सहलीसाठी म्हणजे ‘वन डे’ पिकनिक करता दर आठवड्याच्या अखेरीस बेस्ट डेस्टिनेशन सर्च करत बाहेर पडत असतात.त्यांची ठिकाणही जवळपास ठरलेली असतात म्हणजे विरार डहाणू,कर्जत खोपोली ते अगदी अलिबाग पर्यंत. ही अगदी नित्याची स्थळे.त्यात पावसाळ्यात ते भुशी धरण, भंडारदऱ्यापर्यंत पोचतात.
परंतु तुम्हाला निसर्गाचा निखळ आनंद आणि देवदर्शन या दोन्ही गोष्टींचा संगम घालावायचा असेल तर रायगड जिल्यातील हे एक अनोखे पर्यटन स्थळ उदयास येत आहे.म्हणजे एकाबाजूला एकावर एक रचल्यासारखे गगनास गवसणी घालणारे हिरवेगार डोंगर तर दुसऱ्या बाजूला प्रशस्त खाडी आणि त्यावर तरारलेली हिरवीगार भातशेती.
हे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे श्री स्वयंभु गुरुदत्त तीर्थक्षेत्र.श्री गुरुदेव दत्त माऊलीने सगुण रुपात दिलेले दर्शन क्षेत्र होय.अतिशय निरव शांतता आणि भर नदीपात्रात निर्माण झालेले हे ठिकाण म्हणजे २१ व्या शतकातील चमत्कारच.कडा नदीचे पात्र आणि उंच डोंगरावरुन सुमारे १०० फूट सरळ कोसळणारा निर्झर.व्वा ! या ठिकाणावर आल्यावर मन एकदम प्रफुल्लित होऊन जाते.या जागेची खासियत म्हणजे चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे ठिकाण आणि भर नदीपात्रात गुहेत निर्माण झालेले हे स्वयंभु क्षेत्र.
महाकाय डोंगर म्हणून या ठिकाणी भांदा, कुबल्या, आकर,चाचलचोली,वाघबीळ असे ट्रेकिंगसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
मात्र या निसर्गरम्य स्वर्गीय स्थळी यावयाचे असल्यास आपणास नाश्ता आणि जेवण सोबत घेऊन यावे लागेल कारण अजूनही हे ठिकाण शुद्ध निसर्गाचा शालू पांघरुण आहे म्हणून हॉटेलिंग किवा पायाभूत सुविधेच्या माध्यमातून तितकेसे विकसित झालेले नाही.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनी हा भाग बराचसा विकसित केला आहे.भक्तनिवास बांधले आहेत परंतु अजून ते प्राथमिक अवस्थेत आहेत.
महाराष्ट्र शासनाने पर्यटनाच्या माध्यमातून विविध कामे हाती घेतली आहेत.
श्री स्वयंभु गुरुदत्त मंडळ ही सामाजिक सेवाभावी संस्था या ठिकाणी कार्यरत असून पर्यटक आणि भाविक भक्तगण यांच्या सोयीसाठी त्यांच्या परीने विविध उपक्रम राबवित आहेत.
तर मित्रांनो,या पावसाळ्यात एक अनोखा आनंद घ्यावयाचा असेल तर हे डेस्टिनेशन नक्की ट्राय करा.मुंबई पुण्यापासून फक्त २०० किमी वर आहे.तसेच प्रसिद्ध दिवेआगरला जाण्याच्या मेंदडी गावच्या मार्गावर आहे. मेंदडी गावातून वारळला जाण्यासाठी उजवीकडे वळावे.फक्त २ किमी. वर हे सुंदर ठिकाण तुमची वाट पहात आहे.
(सदर लेख रुपेश पाटील यांनी लिहिला आहे)