सिंधुदुर्ग : शासन व लोकसहभागातून सुमारे पाच लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या शॉर्ट आर्म सेमी अंडर ग्राउंड फायरिंग रेंजचे उद्घाटन गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राज्यात अशा प्रकारचे पहिलेच फायरिंग रेंज सिंधुदुर्ग येथील पोलीस मुख्यालयात उभारण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
कोकण किनाऱ्यावरील सागरी सुरक्षा तसेच पर्यटकांच्या सुरक्षेबाबत उपाय योजनेसाठी कोकण विभागातील पाच जिल्ह्यातील जिल्हा पोलीस प्रमुख, विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली.
सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. याचबरोबर पर्यटकांच्या सुरक्षेबाबतही पोलीस विभागामार्फत काय उपाय-योजना करता येतील याचा या बैठकीत विचार केला जाईल, असे स्पष्ट करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, पोलीस कर्मचाऱ्यांना गृह कर्जात व्याज सवलतीसाठी २९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोकण विभाग पातळीवर मेळावे आयोजित करण्याचे नियोजन आहे. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत: महिला अत्याचार किंवा महिला वरील गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जिल्ह्यातील पोलीस विभागाने परिश्रम घ्यावेत. क्राईम रेट शुन्य ही संकल्पना साकारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत पोलीस विभागाने सी.सी.टी.व्ही तसेच त्यांना आवश्यक असलेल्या निधी बाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावेत त्यांना विशेष निधी देण्याचा प्रयत्न करु.
यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, माजी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिदे यांनी २० लक्ष रुपयांचा हा फायरिंग रेंज प्रकल्प लोकसहभाग, पोलीस कर्मचाऱ्यांचे श्रमदान तसेच शासन निधी याद्वारे अवघ्या पाच लक्ष रुपयांमध्ये पूर्ण केला व मुख्यालयातच फायरिंग सुविधेची सोय केली. शासनाच्या निधीची बचत केल्याबद्धल ते अभिनंदनास पात्र आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम म्हणाले की, राज्यात प्रथमच अशा प्रकारचे अंडर ग्राउंड फायरिंग रेंज सिंधुदुर्गात होत आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फायरिंग सरावासाठी पूर्वी कुडाळला जाव लागायच आता ही फायरिंग रेंजची सुविधा मुख्यालयातच होण्याबरोबर दिवस-रात्र चोविस तास या फायरिंग रेंज सुविधेचा लाभ होणार आहे.
प्रारंभी पोलीस निरीक्षक विश्वजित कांईगडे यांनी स्वागत केल तर शेवटी होम डी.वाय.एस.पी. श्रीमती गावडे यांनी आभार मानले. समारंभास जि.प. सदस्य संजय पडते, तसेच पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते