रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत असून मराठी साम्राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना करावा लागलेला संघर्ष आपणा सर्वाना माहिती आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या मनामध्ये महाराजांचे आदराचे स्थान आहे. राजापूरातील हे शिवस्मारक सर्वांना प्रेरणा देणार असा विश्वास गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी व्यक्त केला. राजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
हेन्री रेव्हिंग्टन गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांनी तोफाचा करार मोडून सिध्दी जोहरला तोफा तसेच दारुगोळा पुरविला व पन्हाळगडावर तोफाचा मारा केला होता. इंग्रजाना अद्दल घडविण्यासाठी महाराजानी १६६१ मध्ये राजापूरात येथून इंग्रजाची वखार उद्ध्वस्त केली. एकेकाळी स्वराज्याची राजधानी राजगड या किल्ल्यावर होती. त्यामुळे राजगड ते राजापूर अशी मध्यवर्ती कल्पना करुन जिर्णोध्दारात स्मारकाची रचना करण्यात आली. राजगडावरील पाली दरवाजातून महाराज राजापूरात येण्यासाठी निघाले हाते. म्हणून पाठीमागे पाली दरवाजाची प्रतिकृति व कोकणातील लाल माती महाराजाच्या पद|स्पर्शाने पावन झाली. म्हणून लाल रंगाचा चौथऱ्यावर उभे राहून ज्या दिशेने इंग्रजाची वखार होती त्या दिशेने अंगुलिनिर्देश करणारे व समस्त मावळयांना आदेश देणारे शिवरायांचे हे शिल्प साकारले आहे, असेही वायकर यांनी इतिहासाला उजाळा देतांना सांगितले.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, वैभव नाईक , जिल्हयातील तसेच राजापूरातील स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.