मुकेश श्रीकृष्ण धावडे,
मुंबई प्रतिनिधी : सायन – चुनाभट्टी येथील शिव शक्ती मित्र मंडळ (ता.26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर) दरम्यान आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक विषयावर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. सध्या लहान मुलांचे अपहरण या विषयावर उपनगर व मुंबई परिसरात ठीक ठिकाणी चर्चेला उधाण आले असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पालक व पाल्यांमध्ये सतर्कता व्हावी या उद्देशाने मंडळातर्फे जनजगृतीपर देखावा साकारण्यात आला आहे.
सध्या मुंबई आणि विभागामध्ये ‘लहान मुलांचे अपहरण’ या संदर्भात मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, यास अनुसरून जास्तीत जास्त पालक आणि पाल्यांनी तसेच इतर लहान मुले यांनी सतर्क होऊन स्व-संरक्षित व्हावे या हेतूने माहितीपर देखावा तयार करण्यात आला आहे तसेच संपूर्ण उत्सव कालावधीमध्ये मंडळाच्या वतीने मुलांना दररोज 15 मिनिटे त्याच्या प्रशिक्षणाचे धडे देत असून सायन पोलीस ठाणे येथील पोलीस देखील मार्गदर्शन करीत आहेत. त्यात अनोळखी लोकांपासून सावध राहा, खाऊ आणि चॉकलेटाच्या अमिशाला बळी पडू नका, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ओळखण्याचे ज्ञान; त्याचबरोबर ‘तरुण वयात वाढता हृदयविकाराचा धोका’, ‘वाढता पृथ्वीचा ऱ्हास’ आणि ‘प्लास्टिक बंदी’ अशा विविध सामाजिक विषया संदर्भात कलाकार अशोक कुर्मी यांच्या संकल्पनेतून माहितीपर फलकांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. देवीच्या मुर्ती सभोवती साकारण्यात आलेला संपूर्ण देखावा पर्यावरण पूरक आहे.