मुंबई : मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश केलेल्या त्या सहा नगरसेवकांच्या प्रवेशावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. कोकण विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या ९३ नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिली. तसे पत्र पालिका आयुक्तांना पाठवल्याने पालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत घोषणा केली. दरम्यान शिवसेनेचे संख्याबळ आता ८७ वरून आता ९३ झाले आहे.
मनसेच्या सातपैकी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी १३ ऑक्टोबरला शिवसेनेत प्रवेश करून मनसेसह भाजपलाही जोरदार धक्का दिला. मात्र वेगळा गट स्थापन करून शिवसेनेत अधिकृत प्रवेश करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची मान्यता मिळणे आवश्यक होते. मात्र याचवेळी मनसेने आयुक्तांकडे तक्रार करून या सहा नगरसेवकांच्या गटाला मान्यता न देता त्यांचे पद रद्द करा, त्यांना कोणत्याही समित्यांच्या बैठकांना बसू देऊ नये अशी तक्रार करण्यात आल्याने त्यांचा पक्षप्रवेश मागील चार महिन्यांपासून रखडला होता. दरम्यान शिवसेनेकडून सभागृह नेते य़शवंत जाधव यांनी शिवसेनेचे ८४, अपक्ष ३ आणि मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ अशा एकूण ९३ नगरसेवकांच्या गटाला मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांने या गटाला मान्यता दिल्याचे पत्र पालिका आयुक्तांना पाठवल्याने त्यांचा शिवसेनेतल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून या नगरसेवकांच्या काय होणार या चर्चेवर अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेच्या जवळपास असणारा भाजप संख्याबळानुसार मागे पडून आता शिवसेना सरस ठरली आहे.
पक्षीय बळाबळ
शिवसेना ८४
अपक्ष ३
मनसेचे ६
एकूण ९३
भाजपा ८३
अपक्ष २
एकूण ८५
विरोधी पक्ष
काँग्रेस ३०
राष्ट्रवादी ९
समाजवादी ६
एमआयएम २
मनसे १