मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. भाजपाने तर आज शिवसेनेला त्यांच्यात बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला. परळमधील शिवसेना नगरसेवक नाना आंबोले यांनाच भाजपाने गळाला लावत पक्षात सामील करून घेतले. त्याचसोबत गोवंडी येथील सेना नगरसेवक दिनेश पांचाळ हेदेखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाच्या घरात दाखल झाले. तसेच मुलुंडमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनीदेखील भाजपात प्रवेश केला.
नाना आंबोले यांचा परळमधील प्रभाग महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत होते. अखेर तिकीट मिळण्याची शक्यता मावळल्याने त्यांनी शिवसेना सोडली. आंबोले यांना शिवसेनेने विविध महत्वाची पदे दिली होती.
खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने दिनेश पांचाळ हे नाराज झाले होते. याच नाराजीतून त्यांनी भाजपात प्रवेश केला. तर मुलुंडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानेच प्रभाकर शिंदे यांनी भाजपाचा रस्ता धरला.