मुंबई : भाजपा आणि शिवसेनेमध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे. मतांसाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करीत आहेत. शिवसेना अजूनही सत्तेला चिटकून बसली आहे. सेनेच्या मंत्र्यांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही, ते केवळ पोकळ धमक्या देत आहेत आणि त्याद्वारे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेनेला आज डिवचले. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची तुलना पाटण्याशी केली. ही तुलना अयोग्य आहे. त्यांनी आपले वक्तव्य त्वरीत मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर सल्ला घेऊ आणि मुख्यमंत्र्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असा इशारा देखील निरुपम यांनी परिषदेत दिला. मुख्यमंत्र्यांच्या मनात बिहारी आणि उत्तर प्रदेश मधील लोकांबद्दल राग असल्याची भावना यातून व्यक्त होते, असेही निरुपम म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मुलुंड येथे प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी मुंबईची तुलना पाटण्याशी केली होती. त्यासंदर्भात निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. भाजपाचे नेते पाटण्याचा अपमान करीत आहेत. हे चुकीचे आहे. उत्तर भारतीयांकडे ते केवळ मतपेढी म्हणूनच पाहतात, असा आरोप निरूपम यांनी केला.