मुंबई : राज्यात सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेचा आज अखेर संयम सुटला. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना आमदारांनी विकास कामे होत नसल्याची तक्रारी करत भाजप विरोधात रोष व्यक्त केला. यावेळी सत्तेतून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला.
शिवसेनेची निर्णायक बैठक सोमवारी मातोश्रीवर पार पडली. याबैठकीला सर्व आमदार, खासदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी विकास कामे होत नसल्याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली. तसेच सेनेच्या मंत्र्यांना डावलले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी जर विकासकामं होत नसतील तर निर्णय घ्यायची वेळ आली आहे, तुमची तयारी आहे का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारताच सर्व आमदारांनी होकार दिल्याचे समजते.
दरम्यान, बैठकीची माहिती बाहेर पडू नये, यासाठी नेते मंडळींच्या मोबाईल-लॅपटॉपवरही बंदी घालण्यात आली होते. शिवाय नेत्यांच्या पीएंनासुद्धा मातोश्रीवर प्रवेश देण्यात आला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली.