
सदर लेख ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक-संचालक महेश म्हात्रे यांनी लिहिला आहे. त्यांच्या परवानगीने प्रकाशित.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लिहिलेली राज ठाकरे यांची “पोस्ट” सोशल मीडियावर पाहिली आणि हसावे की रडावे असा प्रश्न पडला…
तुम्ही म्हणाल, असे काय लिहिलं आहे, राज ठाकरे यांनी,
ते लिहितात, “शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि *भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच*. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना *बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही*. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे *बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे )* त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही ! फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, *समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या* बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !”
राजसाहेबांच्या या “शहाणपणाच्या” पोस्टवर आपण सामान्य लोक काय म्हणणार ?
मला त्यापेक्षा मोठा प्रश्न पडला, की एकोणीस वर्षांपूर्वी, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी नवनिर्माणाचे अभूतपूर्व स्वप्नं पाहणारे राज, त्यांचा चित्ताकर्षक करिष्मा, त्यांचे मन वेधून घेणारे वक्तृत्व आणि ‘तरुण’ बाळासाहेबांच्या देखणेपणाचा अनुभव देणारे रूपवान व्यक्तिमत्त्व… हे सगळं कुठे गेलं…?
आणि आता हे वळणावळणाच्या भाषेत बोलणारे तेच डॅशिंग राज ठाकरे आहेत का?
मला इतरांचे ठाऊक नाही. पण माझा अनुभव आहे की, मुंबईतील मराठी माणसाने, बाळासाहेबांचे नाव घेताच अंगात ऊर्जा संचारते. त्यांची वाणी, त्यांचे विचार, त्यांचे पाहताक्षणी भूल पाडणारे लोकविलक्षण गारुड… हे सारं, सारं महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ओरिजिनल ’ ब्रँड होते. पण हाच ब्रँड आज कोणाच्या ताब्यात आहे, कोण त्याचा वापर करतो, आणि कोण त्याचा बाजार मांडतो…याची थोडी उकल करायला हवी. कारण आजच्या राजकीय बाजारात नाव, वारसा, प्रतिमा या सगळ्यांचे ‘सिंबॉलिक ट्रेडिंग’ सुरू आहे…
राजकारणाचे “ईव्हेंट मॅनेजमेंट” होत आहे. हे लोकांना दिसत नाही असे राज ठाकरे यांना वाटतंय का ?
राज ठाकरे यांनी बाळासाहेबांबद्दल लिहिलेली पोस्ट वाचताना एक प्रश्न वारंवार डोळ्यासमोर येत होता, तो म्हणजे, पुतण्याने आपल्या काकांना वाहिलेली ही खरी श्रद्धांजली आहे का, हा आहे, वेगळ्या दिशेला निघालेल्या मनसेच्या राजकीय ‘रीब्रँडिंग’चा नवा प्रयोग?
राजसाहेब म्हणतात, “बाळासाहेबांनी हिंदूंना व्होटबँक म्हणून पाहिलं नाही.”
छान! पण मग बाळासाहेबांच्या नावाने, त्यांच्या फोटोने, त्यांची भाषणे दाखवून, तुम्हीच महाराष्ट्रभर ‘हिंदुत्वा’ची बाजारात बोली लावत नव्हतात का?
मनसे स्थापनेपासून प्रत्येक सभेत राज बोलायचे,
“आम्ही खरे बाळासाहेबांचे वारस”…
हे वाक्य जणू ट्रेडमार्कसारखे झालं होतं. मग वारसा चालवला कुठं?
पक्षाचं संघटन? कोसळलं. ढासळलं… एकदा नव्हे वारंवार .
विचारधारा? दिशाहीन…
नेतृत्व? फक्त भाषणांपुरतं.
आणि कार्यसंस्कृती… रात्रीच्या औषधापुरती !
बाळासाहेबांनी हिंदुत्वाला ‘अस्मिता’ मानले…
तुम्ही मात्र सगळ्याच अस्मितांचा, मराठी, हिंदुत्व सगळ्याचा, हक्काचा “राजकीय चार्जिंग पॉईंट” करून टाकलात.
राज म्हणतात, “बाळासाहेबांनी प्रबोधनकारांचा तर्कवाद सोडला नाही”
परफेक्ट! मग आमच्या समोर प्रश्न उभा राहतो, प्रबोधनकारांचा तर्कवाद जो विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक समानतेवर उभा होता…तो मनसेच्या भूमिकांमध्ये शोधायला गेलं, तर का सापडत नाही ?
प्रबोधनकारांनी जात-धर्मावर आधारित भेद मानायला नकार दिला.
पण मनसेचं अवघे राजकारण भेदावर सुरु झाले, आजही त्यावरच टिकलंय.
‘स्थानीक विरुद्ध परप्रांतीय’ एव्हढाच राज यांच्या आकलनाचा परीघ.
मग, हा कोणता तर्कवाद? हा कोणता प्रबोधनकारांचा वारसा?
राजसाहेब म्हणतात,
“इतरांना बाळासाहेब आणि प्रबोधनकार माहित नाहीत.”
छान पंचलाइन ! तो टोमणा कदाचित उद्धव ठाकरे यांना असावा, किंवा शिंदे सेनेला असावा.
असू द्या,
पण अशी, खणखणीत “पंचलाइन” देण्याआधी, दणदणीत ‘परफॉर्मन्स’ दाखवावा लागतो.
त्याचे काय ?
मी डोळ्याने पाहिलेले आणि प्रत्यक्ष अनुभवलेले बाळासाहेबांचे राजकारण म्हणजे
संघटन
सातत्य
स्पष्टता
कठोर निर्णय
आणि लोकांवर अस्सल प्रेम !
कोणीही माझ्या या मताशी असहमत होणार नाही !
याउलट,
पाहिल्या दोन-तीन वर्षातील
राजसाहेबांचे राजकारण म्हणजे,
एक झंझावात होता. काहीतरी नवीन करून दाखवण्याचा निर्धार होता… पण आरंभशूर “जेमिनी”ला शोभेल, असा तो अल्पकाळ टिकला…
तेरा आमदार आणि अनेक नगरसेवक बाहेर पडले आणि, राज मुडी बनले !
मग काय …
मूड झाल्यावरच घेतली एखादी भूमिका !
क्वचितच घेतले जाहीर सभा,मेळावे.
ज्यांना प्रसिद्धी मिळाली केवळ फटकळ वक्तव्यामुळे…
बाकी, पक्षाचे धोरण, कार्यक्रम , योजना … त्यांचा पाठपुरावा,
काही नाही…!
कधी मोदी समर्थन, कधी विरोध
कधी हनुमान चालीसा, कधी पुतळा राजकारण…
कधी फेसबुक लाईव्ह, तर कधी मुलाखतीचे नाट्य …
आणि सगळ्यात खटकणारे म्हणजे… सगळ्याची अनिश्चितता…
कशातही सातत्य नाही !
म्हणूनच आज शिवसेनेत फाटाफूट होऊनही, महाराष्ट्रातील लोकजीवनात बाळासाहेबांचे नाव “जिवंत” आहे,
पण मनसेचा प्रभाव मात्र नाममात्र आहे.
*समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या* बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !”
हे राज यांच्या पोस्टमधील अखेरचे वाक्य तर अक्षरशः ‘स्लोगनसाठी स्लोगन’, पण मला कुणीही सांगावं, हे कृतीत दिसलं कुठे?
मनसेने समाजकारणाच्या नावाखाली केलेल्या कामांची यादी द्यावी…
एखादा ‘स्थानीय लोकाधिकार’सारखा मराठी तरुणांना रोजगार देणारा उपक्रम सांगावा ?
रुग्णसेवेला वाहिलेले एखादे राज्यव्यापी अभियान दाखवावे ?
मनसेच्या स्थापनेपासून गेल्या एकोणीस वर्षात आपण, आपल्या पक्षाच्या नेत्यांनी किती शिक्षणसंस्था काढल्या ?
किती शैक्षणिक सुधारणांसाठी तुमच्या पक्षाने प्रामाणिक प्रयत्न केले ?
संघटित सामाजिक सुधारणा करण्यासाठी तुमचे योगदान काय ?
ज्या प्रबोधनकारांच्या विचार वारशाला पुढे नेण्यासाठी, प्राणांची आहुती देणाऱ्या डॉ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या दिवसा उजेडी हत्या झाल्यानंतर तुमची भूमिका काय होती ? तुम्ही त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी कोणते सामाजिक कार्य हाती घेतले होते किंवा आहे ?
मनसे किंवा राज ठाकरे यांनी आजवर कोणती दीर्घकालीन आंदोलनं केली ?
शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, बदलते ग्रामजीवन, वाढते शहरीकरण आणि त्यात मराठी समाजाची होणारी फरपट यावर शाश्वत उपाय योजना सुचवण्यासाठी तुम्ही आजवर काय केले ?
काही नाही.
बाकी फक्त, फोटो, पोस्टर, भाषणं आणि अधूनमधून नाट्यमय भूमिका.
आणि तेही करण्याचा कंटाळा आला की, घरासमोर, शिवाजी पार्कवर मस्त रोषणाई केली की झालं.
लोकं, हवा प्रदूषणाने खोकून हैराण झाली तर झाली …
साहेब आपल्याच “चमकदार” कामगिरीवर खुश !
बाळासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत, शिवसैनिकांची सेना उभी केली.
राजसाहेबांनी… लाळघोट्या बिल्डरांची, कानफाट्या बाजार बुणग्यांचे घोळके जमवले.
आणि जाहीर सभेत भाषा मात्र, “माझ्या हातात एकदा महाराष्ट्राची सत्ता द्या”…
सत्ता म्हणजे, कीर्ती कॉलेजच्या अशोकचा वडापाव आहे काय ?
“घ्या, राजसाहेब, चावा सावकाश, खावा सावकाश “
काळ बदलला आहे, राजकारण बदलत आहे… मुख्य म्हणजे, आपल्या एका शब्दावर “गेम करणारे”, खळ-खट्याक करून नडणारे, केसेस अंगावर घेऊन आयुष्यभर खस्ता खाणारे सैनिक आता गेले…
साहेबांप्रमाणे आता त्यांनाही “सुगी”चे दिवस हवेत… हवेतील आश्वासने नको .
त्यामुळे राज यांनी समजून घेतले पाहिजे, बाळासाहेबांचा वारसा ‘नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंटरी’सारखा
पडद्यावर दाखवता येत नाही…
बाळासाहेबांचा वारसा म्हणजे,
रक्त
घाम
संघटना
सातत्यपूर्ण लढा
आणि कार्यकर्त्यांवर मनस्वी प्रेम
फोटो, व्हिडिओ, आठवणी, नकला, घरासमोरच्या रोषणाई आणि भावनिक पोस्ट्स याला कुणी वारसा म्हणत नाही .
आज बाळासाहेबांचा वारसा खरा कोण पुढे घेऊन चालला आहे ?
आज कोण मराठी माणसाचा खरा वाली आहे ?
हा प्रश्न महाराष्ट्र स्वतः विचारत आहे !
आणि त्या प्रश्नाचं उत्तर लोकांनी २०१४ नंतर अनेकदा दिलं आहे.
तरीही तुम्ही आरशात पाहायला तयार नाहीत… याला काय म्हणावं ?
एकूणच काय तर,
राजसाहेब,
बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला श्रद्धांजली अर्पण करा,
पण त्यातही राजकारण मिसळू नका.
बाळासाहेबांच्या नावाचा ‘ब्रँड’ बनवून,
त्यांच्या विचारांना ‘कंटेंट’ बनवून,
आणि त्यांच्या वारशाला ‘स्लोगन’ बनवून
राजकारण करायचं असेल,
तर लोक विचारणारच की,
“केवळ वारसा सांगणे सोपे आहे हो , तो जगवण्याची,
पुढच्या पिढीला देण्याची, क्षमता कोणत्या ठाकरेंमध्ये आहे?”

महेश म्हात्रे, संपादक-संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर














