रत्नागिरी, (आरकेजी) : प्रस्तावित नाणार रिफायनरी विरोधात शिवसेनेने आज पुन्हा एकदा स्वत:च्याच सरकारविरोधात एल्गार पुकारला. नाणार परिसरात संघर्ष यात्रा काढून भाजपचा निषेध नोंदवला. भूसंपादन झालेले नाही. तरिही केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांबरोबर करार केले. ही फसवणूक आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. भर पावसात काढलेल्या या संघर्षयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.
राजापूर तालुक्यातील या प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. तो व्हावा यासाठी भाजप आग्रही आहे. नुकतेच शिवसेनेला विश्वासात न घेता केंद्र सरकारने सौदीची ‘अराम्को’ कंपनी व अबुधाबीची सनॉक या परदेशी कंपन्यांशी करार केले आहेत. त्यामुळे शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने प्रकल्प होऊच देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. विरोध तीव्र करण्यासाठी खासदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली डोंगर तिठा ते चौके अशी यात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसात निघालेल्या या संघर्ष यात्रे दरम्यान पाऊस पडत असतानाही शिवसैनिक आणि ग्रामस्थ सहभागी झाले. मुख्यमंत्री, राज्य सरकार आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना स्थानिकांबरोबरच असेल असे खासदार राऊत म्हणाले.