मुंबई, बुधवार (प्रतिनिधी)- मनसेला जय महाराष्ट्र करुन हातावर शिवबंधन बांधणारे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या तक्रारीवरुन एसीबीने त्यांच्यामागे ससेमिरा लावला आहे.
मनसेच्या सहा नगरसेवकांनी सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना प्रवेशामुळे मनसेसह भाजप दुखावला होता. मनसेने तर कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करुन तब्बल चार महिने प्रवेश राेखून धरला. अखेर आठवडाभरापूर्वी त्या सहा नगरसेवकांच्या प्रवेशावर महासभेत शिक्कामोर्तब झाले. यानंतर शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली. मात्र, त्यापूर्वीच परमेश्वर कदम यांच्या मागे एसीबीचा ससेमिरा लागला आहे. ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत गैरमार्गाने अधिक संपत्ती मिळवल्याच्या आरोपखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २००७ ते २०१२ या नगरसेवक पदाच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत १३ लाख ९ हजार इतकी म्हणजे, ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ६४ टक्के अधिक संपत्ती त्यांच्याकडे मिळाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मला अडकवल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप परमेश्वर कदम यांनी केला आहे.