डोंबिवली : श्रावण महिन्याचे औचित्य साधत मंगळागौर कार्यक्रम म्हणून शिवसेना महिला आघाडी (डोंबिवली शहर – कल्याण ग्रामीण) तर्फे महिलांसाठी झिम्माफुगडी आणि महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम असा दुग्ध-शर्करा योग जुळवून आणला. सिनेतारकांच्या उपस्थितीत महिला सैनिकांनी अभिनयासह धार्मिक, सांस्कृतिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथांचा संपूर्ण इतिहास सादर करताच उपस्थित महिलांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडून मंगळागौरच्या झिम्माफुगडीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
पश्चिमकडील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात शिवसेना डोंबिवलीतर्फे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड, डोंबिवली पश्चिम शिवसेना महिला संघटक किरण मोंडकर, पूर्व संघटक मंगला सुळे यांच्या विशेष प्रयत्नाने कार्यक्रम संपन्न झाला. मंगळागौर कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानतंर महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा कार्यक्रमात प्रथम महाराजांचा जन्म, नामकरण, पाळणा, ओव्या व त्यानंतर प्रतापगडावरील अफजलखानाच्या वधाचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या महिनाभरापासून सराव करणाऱ्या महिलांच्या गटांनी झिम्मा, फुगडी, मंगळागौरीची गाणी, निरनिराळे खेळ, खास ठसकेबाज उखाणे, ताळ्यांवर धरलेला नृत्याचा ठेका, फुगडयांचे विविध प्रकार सादर करून उपस्थित महिलांना खुर्चीला खिळवून ठेवले.
याप्रसंगी खासकरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, वृषाली श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हा संपर्क संघटक संध्याताई वढावकर, जिल्हा संघटक लताताई पाटील, विजयाताई पोटे, महिला बाल कल्याण समिती सभापती दिपाली पाटील, महानगर संघटक वैशाली दरेकर, उपजिल्हा संघटक स्मिता बाबर, माजी नगरसेविका तथा शिवसेना चित्रपट सेना सचिव मनिषा धुरी, तालुका संघटक सुलोचना पवार आणि नगरसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश नायकोडी आणि शिवसेना ग्राहक मंच अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी केले.