मुंबई : शिवसेना -भाजप मागील २० वर्षापासून मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगत आहेत. तरीही आजपर्यंत विकास तर दूरच, मुंबईतील नागरिकांना साध्या मूलभूत सोयीसुविधाही ते पुरवू शकले नाहीत. त्यामुळेच मुंबई शहराचा स्तर घसरत चालला आहे, अशी टीका देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली. अंधेरीतील रहेजा क्लबमध्ये मुंबई काँग्रेसने घेतलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई हे सर्वात जास्त महसूल मिळवून देते. असे असूनही या शहरात रस्ते आणि रेल्वेच्या सुविधा नाहीत. जो देश अंतराळात यान पाठवतो. इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे. त्या देशाच्या आर्थिक राजधानीत उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना का मिळत नाही? असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला.
पालिकेतील सत्ताधारी सामान्य जनतेला चांगले रस्ते, चांगली दळणवळणाची साधने का देऊ शकले नाहीत? जेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. तेव्हा काँग्रेसने मुंबईला जागतिक दर्जाचे विमानतळ, मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी सेतू, ईस्टर्न फ्री वे अशा दळणवळणाच्या सुविधा दिल्या. पण आता मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेस ला मतदान करा आणि आपल्या मताचा सदुपयोग करा असे आवाहनदेखील चिदंबरम यांनी केले. रहेजा क्लबमधील या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार बलदेव खोसा, मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव उपस्थित होते.
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली
नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे.भारताचा विकास दर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क्यावरून ६.६ टक्क्यांपर्यंत पर्यंत घसरला आहे आणि येणाऱ्या काळात आणखी कमी व्हायची शक्यता आहे. छोटे व्यावसायिक व सामान्य जनतेला फार हाल सहन करावे लागत आहेत. कित्येक लोक बेरोजगार झाले. परदेशी गुंतवणूक कमी झाली आहे. परदेशी गुंतवणूक देशात झाली नाही, तर भारताची अर्थव्यवस्था कशी सुधारणार असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला.