रत्नागिरी, (आरकेजी) : कोकणातही शेतकरी संपाचे लोण पोहचले आहेत. कर्जमाफ़ीच्या मुद्द्यावर आक्रमक होत आज शिवसेनेने अर्धा तास मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. शिवसेनेच्या या पावित्र्यामुळे राज्य सरकारची मात्र कोंडी झाली आहे.
सहा दिवसांपासून राज्यातला शेतकरी संपावर गेल्यानंतर कोकण परिसर शांत होता. आज अचानक शिवसेना त्यांच्याच सरकारविरोधात आक्रमक झाली. आंबा बागायतदारांची कर्ज माफी झालीच पाहिजे, अशी मागणीच शिवसेनेने लावून धरली. आंबा बागायतदारांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीसाठी हातखंबा इथे रास्ता रोको करण्यात आला.
सुमारे १५० जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले. कोकणपट्टा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आता कोकणातच शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे भाजपसोबतचे संबंध आणखी ताणले गेले आहेत.