रत्नागिरी (आरकेजी): स्थानिकांना विरोध असताना केंद्र शासनाने प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. यामुळे रिफायनरीचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेेनेेची सुुरूवातीपासून प्रकल्पाला विरोधात भूमिका होती. मात्र शासनाच्या निर्णयामुळे त्यात अधिक भर पडली असून स्थानिकांचे जनआंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा, आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या काही महिन्यांपासून रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन व्यापक झाले आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे. मात्र तरी सुद्धा बुधवारी केंद्र सरकारकडून सौदी अरेबिया येथील अरामको कंपनीबरोबर करार केला. गुरूवारी राजापुरात त्याचे जोरदार पडसाद उमटले. केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. आता आमदार उदय सामंत यांनीही आंदोलनात उडी घेतली आहे. नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरीसाठी शिवसेना संघटना स्तरावर तेथील आमदार राजन साळवी व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली विरोधाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासोबत रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील शिवसेनाही राहणार असल्याचे आमदार सामंत यांनी परिषदेत स्पष्ट केले. रिफायनरीबाबत सौदीतील कंपनीशी केंद्र शासनाने केलेल्या कराराचा सामंत यांनी निषेध व्यक्त केला आहे. ज्या-ज्या वेळी या प्रकल्पाविरोधी आंदोलन असेल त्यावेळी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील शिवसेनाही उतरेल. व्यापारी, बागायतदार, मच्छीमार आदी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.