
जिल्ह्यात शिवसेना उबाठाला खिंडार
माजी आमदार सुभाष बने, माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, उबाठा जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेला कोकणी जनतेने कायम ऑक्सीजन दिला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी : शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची रत्नागिरी येथील चंपक मैदानावर आभारयात्रा, पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार सुभाष बने, माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, उबाठा जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी राज्यभर आभारयात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची सुरूवात रत्नागिरीतून करण्यात आली. चंपक मैदान येथील आभारयात्रेला शिवसेनानेते रामदास कदम, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत, महसूल राज्यमंत्री ना.योगेश कदम, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, राजेंद्र महाडीक, विलास चाळके, बंड्या साळवी, जयसिंग घोसाळे, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर, सौ.रचना महाडीक, सौ.शिल्पा सुर्वे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता व आजही आहे, हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. आपल्याला शिवसेना अधिक भक्कम करायाची आहे, यासाठी गावातील वाड्यावाड्यांतून पोहोचून येथील जनतेच्या मनापर्यंत पोहोचा. शिवसेनेला कोकणी जनतेने कायम ऑक्सीजन दिला आहे, त्याचा पुरवठा आजही कायम आहे. पक्षवाढीसाठी फेसबुक नव्हे तर फेस टू फेस जावे लागते. आपण सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही. गरीब घरात जन्म घेऊन शिवसेना वाढीसाठी आयुष्य वेचले. ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण गहाण ठेवला तोच धनुष्य आपण बंधनमुक्त केला. त्यामुळेच महाराष्ट्रातील आपल्यासोबत आहे. रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

भाषणाच्या सुरूवातीलाच ना.शिंदे यांनी उपस्थित लाडक्या बहिणी, भावांचे जाहीरपणे आभार मानले. विधानसभेतील विजय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर खूप प्रेम केले. तेवढ्याच ताकदीने बाळासाहेबांनीही कोकणी जनतेवर प्रेम केले होते. कोकणी जनतेचे हे प्रेम आजही खऱ्या शिवसेनेसोबत आहे. त्यामुळेच विधानसभेतील विजयामध्ये कोकणाचा सिंहाचा वाटा असल्याचे ना.शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेचा स्ट्राईक रेट 95 टक्के आहे. त्यामुळेच कोकणातील 15 पैकी 14 आमदार विजयी झाले. राज्यात 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता. तो पूर्ण करत 232 आमदार विजयी केले. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात बाळासाहेबांचे खरे वारसदार आपणच असल्याचे सिद्ध झाले आहे. कोकणी जनतेने निशाणी शोधून शिवसेनेला विजयी केले, त्याबद्दल आपण ऋणी असल्याचे ना.शिंदे यांनी सांगितले.
अडीच वर्षांपूव मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर आपण बंद पडलेली विकासकामे, प्रकल्प, पाणी योजना सुरू केल्या. सर्वसामान्य जनतेला जे पाहिजे आहे, ते देण्याचे काम सत्ताधारी म्हणून आपले आहे. पदे येतात जातात, सत्ता येते जाते. परंतु आपण राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ बनलो, हे सर्व मोठे पद आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अखेरपर्यंत जनतेच्या मनात राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ना.शिंदे यांनी सांगितले.

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झोपेतसुद्धा एकनाथ शिंदेच दिसतात. उठसूठ आरोप करणे हा एकमेव धंदा त्यांचा सुरू आहे. परंतु आपण आरोपांना विकासकामातून उत्तर देत असतो. शिवसेनेत गेलात डोकी फुटतील, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. परंतु डोके फोडणारे आता त्यांच्याकडे आहेत का? याचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करणे आवश्यक आहे. माझ्या नादाला लागू नका. दाढी काय आहे, हे अडीच वर्षांपूवच दाखवून दिले आहे, असा इशारा ना.शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
तुम्ही आम्हाला सत्ता दिली, या सत्तेचा उपयोग कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी करून घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोकणातील कोयना अवजल समुद्राला जाऊन मिळते, त्याचा वापर कोकणासाठी व्हावा ही अनेक वर्षांची मागणी होती. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाची निर्मिती केली. त्याचे काम आता सुरू झाले आहे. कोयनेतील 67 दशलक्ष घनमीटर पाणी आता अडवले जाणार असल्याचे ना.शिंदे यांनी सांगितले.
अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर गेला. आताही काही हजार कोटींचे करार करून उद्योग उभारणीसाठी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. वाटद, झाडगाव येथे 30 हजार कोटींचे प्रकल्प उभे रहात आहेत. मुंबई -गोवा जोडणारा एक्सप्रेस हायवेची निर्मिती करण्याचे काम सुरू असून दोन्ही राज्ये काही तासात जोडली जाणार आहेत. कोकणाला कॅलिफोनियासारखे आपल्याला घडवायचे आहे. यासाठी विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा, असे आवाहन ना.शिंदे यांनी केले.