रायगड : किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात जय जिजाऊ-जय शिवरायचा अखंड जयघोषात साजरा झाला. मंगळवारी पहाटे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर दैदिप्यमान सोहळ्याला सुरुवात झाली. भगवे ध्वज, शिवाज महाराज की जय, पारंपरिक वेशभूषेतील शिवभक्त यामुळे प्रत्यक्षात शिवकाळ रायगडावर अवतरल्याचा भास होत होता.
पारंपरिक लवाजम्यासह पालखी सोहळा, शिवकालीन युध्दकलांची चित्तथरारक प्रात्यक्षीके, ढोल-ताशांसह वाद्यांचा दणदणाट, मानाची सासनकाठी आणि भगव्या ध्वजाचा रुबाब या ठिकाणी होताच शिवाय शिवशाहिरांचा मानाचा मुजरा यामुळे तर उत्साहाची शोभा द्विगुणीत झाली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने किल्ले रायगडावर ५ व ६ जून या कालावधीत शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा केला. सोमवारी पारंपारिक कार्यक्रम व उपक्रमांबरोबरच‘संवर्धन रायगडाचे…मत शिवभक्तांचे’ हा परिसंवाद चांगलाच रंगला.
इचलकरंजीच्या शिवभक्तांकडून नगारखान्यासमोरील भव्य ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकविण्यात आला. शिवछत्रपतींचे चौदावे वंशज व गडकोट-किल्ल्यांचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर खा. संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांनी चांदी मूर्ती व मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक आणि पूजन केले. यानंतर तलवार उंचावत लाखोंच्या संख्येने गडावर जमलेल्या शिवभक्तांना त्यांनी अभिवादन केले.
राजसदरेवरील मुख्य सोहळ्यानंतर राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालखी मिरवणूका काढण्यात आल्या. राजसदरेवरूननगारखान्या मार्गे पालखी बाहेर पडली. होळीचा माळ येथे गेल्यानंतर शिवपुतळ्यासमोर शिवकालीन युध्दकला, ढोलताशा पथके, ‘बादल’ व ‘प्रिन्स’ या घोड्यांचेअभिवादन, लेझीम-मल्लखांब आदी कलागुणांचे सादरीकरण झाले. यानंतर मिरवणूक बाजारपेठ मार्गे जगदिश्वर मंदीराकडे रवाना झाला. जगदिश्वर मंदीरात पूजनानंतर पालखी मिरवणूकीची सांगता शिवछत्रपतींच्या समाधीजवळ झाली.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर संभाजीराजे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी शहाजीराजे छत्रपती, जलसंपदा राज्यमंत्री विजयशिवतारे, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, शिवकालीन शस्त्रासंग्राहक गिरीश जाधव, ऍड. राजेंद्र कोंढरे, जि.प.शिक्षण सभापती अमरीशसिंह घाटगे, धैर्यशील माने, संजीव भोर-पाटील, कामाजी पवार, आप्पासाहेब कुटेकर, ऍड. मनोज आखरे, गजानन देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजीराजे पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांत शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी प्रश्नात राजकारण न करता सर्वांनी शेतकरी हित जपण्याची गरज आहे. मोठ्या बोक्यांना कर्जमाफी न देता सर्वसामान्य व गरजू शेतकर्यांची कर्जमाफी व्हायला हवी. भविष्यात रायगडाची माती कपाळी लावल्याशिवाय आणि शिवछत्रपतींसमोर नतमस्तक झाल्याशिवाय कोणालाही राजकारण करता येणार नाही.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा
आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा त्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन करत आपण स्वत: १२ बलुतेदार व १८ पगड जातींसह बहूजन समाजाचे नेतृत्व करत सर्वांना बरोबर घेवून या पुढील काम करणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
शिवराज्यभिषेक सोहळा क्षणचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा