अलिबाग: रायगड किल्ल्यावर सिंहासन उभारणी संकल्प दिवस तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा दि. ३ ते ७ जून या कालावधीत विविध शिवप्रेमी संघटनांतर्फे साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक झाली. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अजित गवळी, कोकण शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष शैलेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी महाड विठ्ठल इनामदार, प्रभारी तहसीलदार सचिन गोसावी, शैलेंद्र कांबळे, कोकण कडा मित्र मंडळाचे नितीन पावले, संतोष जाधव, तसेच बबन पाटील, अनिकेत कदम, एस.एन.इंगळे, कोठेकर, सुरेश पवार, निलेश माळवी आणि कोकण कडा मित्र मंडळ व शिवराज्याभिषेक सोहळा मंडळाचे पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मलिकनेर पुढे म्हणाले, राज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, प्रथमोपचार सुविधा तसेच किल्ल्यावरील विद्युत व्यवस्था, एस.टी.बसेसची व्यवस्था करणे, पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवण्याबाबतच्या सूचना दिल्या. गडावर स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, पोलीस बंदोबस्त चोख ठेवणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी संबंधितानी घ्यावी तसेच सर्व मंडळांनी सहकार्य करावे. यासाठी प्रशासनाचेही सहकार्य राहिल असे त्यांनी यावेळी सांगितले.