पुणे : छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे, त्या विचारांचा अवलंब करुन राज्य कारभार करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवनेरी (ता. जुन्नर) येथील शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. शिवजंयती सोहळ्यास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे, आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
परकियांच्या आक्रमणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला मुक्त केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिवरायांच्या प्रेरणेने, स्फूर्तीने त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे, त्या विचारांचाच अवलंब करुन राज्य कारभार लोकाभिमुख करण्यावर भर देणार आहोत. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेला स्वाभिमान शिकविला. राज्य कारभार कसा चालवतात याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श घालून दिला.