रत्नागिरी : शिवप्रेमींनी केलेली प्रचंड गर्दी आणि मान्यवर वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी डेरवण येथील श्री शिवसमर्थ गड येथे शिवजयंती सोहळा उत्साहाने साजरा झाला. यावेळी कोकण, मुंबई, पुणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त येथे उपस्थित होते.
श्रीसंत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याप्रसंगी होणार्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मुकुंद दातार होते. सकाळी ९ वाजता ध्वजवंदन, शांतीसुक्त पठण आणि ईशस्तवन होऊन सभेला प्रारंभ झाला.
भागवताचार्य प्राध्यापक सु. ग. शेवडे यांनी प्रास्ताविक करून सभेला सुरुवात केली. सभेच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांचा आणि वक्त्यांचा, संस्थेचे मुख्य कार्यकारी विश्वस्त विकास वालावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या परिसरातील रुग्णांना वैद्यकीय मदत करणारे सुमित्रा कांबळे (सिंधुदुर्ग), मालती कुलापकार (दापोली), सदाशिव घाग (खरवते) यांचा मुकुंद दातार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांना चांदीचा पेला आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. त्यानंतर, आठवीत जाणार्या मुलींना प्रोत्साहन म्हणून मनगटी घड्याळ देण्यात आले.
माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार यांनी आपल्या भाषणामध्ये डेरवणच्या स्थानात सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्याचा गौरव केला. हर्षदा जोशी यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या परस्पर संबंधांचा उल्लेख केला. सचिन कानिटकर यांनी, “आपण माणसाला देवत्व देतो. पण त्याच्या कार्याला विसरतो. आपण त्याचे देवत्व काही प्रमाणात का होईना, आपल्यात बाणवले पाहिजे.” असे सांगितले.
सुनील बापू लाड यांनी आपल्या भाषणात राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यातील परस्पर संबंध कसे असायला हवेत ते विशद केले.
प्रमुख पाहुणे मुकुंद दातार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयी सांगताना त्यांच्या भाव जीवनाचाही आढावा घेतला. “शिवरायांच्या प्रत्येक महत्वाच्या राजकीय विजयाला वैयक्तिक जीवनातील दु:खद प्रसंगाची झालर होती. तशी अनेक उदाहरणे आहेत”, असे सांगितले. सार्वजनिक जीवनात वावरताना वैयक्तिक सुखदु:ख, मानापमान बाजूला ठेवावे लागतात, असेही त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता क्रीडा संकुलापासून ते श्री शिवसमर्थ गडापर्यंत शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो शिवप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते.