कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न तात्काळ सोडवा अशी मागणी एसएफआयने कुलगुरूंकडे केली आहे. राज्यातील पदवी व पदव्युत्तर परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले संभ्रमाचे वातावरण दूर करत, आपण घेतलेल्या विविध निर्णयांचे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एस.एफ.आय) कोल्हापूर जिल्हा कमिटी स्वागत करते. कोरोना आपत्कालीन परिस्थितीत आपण घेतलेले सर्व निर्णय विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच घेतले असणार याबाबत दुमत नाही, परंतु आपण घेतलेले काही निर्णयांबाबत अजून स्पष्टीकरण न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे , त्यावर त्वरित पुनर्विचार करून निर्णय व्हावाम अशी विनंती संघटनेने केली आहे.
संघटनेच्या मागण्या :
- शेवटच्या वर्षातील जे विद्यार्थी परीक्षांना सामोरे जाणार आहेत, त्यांच्या संबंधित सत्रातील परीक्षांसोबत मागील बॅकलॉग/ ATKT असल्यास त्या परीक्षा देखील घेण्यात याव्यात, अन्यथा ATKT असल्याने विषयांच्या अनुषंगाने योग्य मूल्यमापन करण्याची पर्यायी यंत्रणा उभी करावी, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही.
- शेवटच्या वर्षाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे प्रकल्प/जर्नल ऑनलाईन सबमिट करताना अडचण येत आहेत. तसेच अनेक मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने अडचणी येत आहेत. अशा विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या महाविद्यालयांंना सुचना करण्यात याव्यात.
- विद्यापीठात ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांचे कामाचे तास कमी भरले असतील तर ते माफ करण्यात यावेत. कारण ते या काळात विद्यार्थ्यांनी भरून काढले असते. तसेच या विद्यार्थ्यांची फी अजूनही रिफंड झालेली नाही, तरी ती त्वरित खात्यात जमा करावी.
- कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क ( प्रवेश, परिक्षा आणि वसतिगृह फी) रद्द करा. त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा.
सर्वेश सवाखंडे ( जिल्हा अध्यक्ष), रत्नदिप सरोदे (जिल्हा सचिव), प्रेरणा कवठेकर(जिल्हा सहसचिव), मालोजीराव माने(जिल्हा कमिटी सदस्य) यांनी निवेदन दिले आहे.