नागपूर : मुंबई येथील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. पुतळ्याची उंची कमी केली नाही. हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेल, तेवढा राज्य शासन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पहिल्यांदा केवळ संकल्प चित्र पाठविण्यात आले होते तो प्रस्ताव नव्हता. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळ्याचे डिझाईन करताना समुद्रातील वारे, लाटा यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. समुद्रात हवेचा दाब सहन करू शकेल, अशा पद्धतीने पुतळा व स्मारकाचा आराखडा केला आहे. पुतळ्याची उंची कमी केली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.