मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याची वस्तुस्थिती खरी नसून हे स्मारक जगातील सर्वाधिक उंचीचे होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदन केले. त्यावर विधानसभेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराने पुतळा व चौथऱ्याचे गुणोत्तर ६०:४० असे ठरविले. हा मोठ्या उंचीचा पुतळा शेकडो वर्षे टिकण्याच्या दृष्टीकोनातून पुतळ्याचे वजन पेलण्यासाठी तेवढाच मजबूत चौथरा असायला हवा. त्यानुसारच सल्लागाराने ठरविलेल्या गुणोत्तरानुसार तयार आराखड्यास मान्यता दिली आहे.
महसूल मंत्री श्री. पाटील यांनी निवेदनात माहिती दिली की, स्मारकाच्या कामासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुकाणू समिती, विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली आहे. पुतळा व चौथऱ्याचे गुणोत्तर साठास चाळीस असेल. पुतळ्याची उंची २१० मीटर असणार आहे. त्यामध्ये पुतळा व भरावासह चौथरा यांची उंची अनुक्रमे १२१.२ मीटर व ८८.८ मीटर एवढी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीने सर्व तांत्रिक बाबी तपासून प्रस्तावित केली होती. त्यास उच्चस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार सविस्तर नकाशे व आराखडा तयार करून त्याआधारे जागतिक स्तरावर खुल्या निविदा मागविण्यात आल्या आणि २१० मीटर उंचीच्या पुतळ्यासह प्रकल्पासाठी कंत्राटदाराला `स्वीकृती पत्र` (letter of acceptance- LOA) देण्यात आले आहे.
जागतिक स्तरावरही पुतळ्याची उंची ही चौथऱ्यासह मोजली जाते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात होणारे स्मारक जगातील सर्वाधिक उंचीचेच होणार आहे.