मुंबई : मुंबईवरील ओखी वादळाचे संकट जरी गुजरातच्या दिशेने सरकत असले तरी या वादळाचा परिणाम भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी आयोजित व्यवस्थेवर झाला आहे. सकाळ पासून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे येथे उभारण्यात आलेला मंडप रात्री ८ च्य सुमारास कोसळला. यात तीन जण जखमी झाले. जखमीना पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार्थ दाखल केल्याची माहिती पालिकेने दिली.
शिवाजी पार्क मैदानावर महापौर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर पालिका नियंत्रण कक्षाचे छत पाणी जास्त प्रमाणात साचल्याने कोसळले होते. सुदैवाने त्यावेळी कोणालाही कसलीही इजा झाली नव्हती. मात्र रात्री ८.०५ वाजताच्या सुमारास शिवाजी पार्क येथे अनुयायीसाठी उभारलेला मोठा मंडप अचानक पूर्णपणे कोसळला. या दुर्घटनेत यमुनाबाई खांदारे (४०),महादेव खांदारे (५५) व निलेश भंडारी (२८) हे तिघेजण जखमी झाले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.