रत्नागिरी (आरकेजी): येणारा काळ खुप कठीण व खडतर आहे. त्यामुळे युवकांनी तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्या न करता, स्वाभिमानाने स्वतःच्या शेतात काम करावे. शेतात काम करून प्रतिष्ठा कमी होत नाही तर वाढते, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ तानाजी चोरगे यांनी केले. शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत विद्यार्थी सत्काराच्या प्रसंगी ते बोलत होते.
शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटी चेअरमन सुनिल गणपत टेरवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ चोरगे यांना ‘बँकिंग फ्रंटिअर’ संस्थेचा बेस्ट चेअरमन राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याबद्दल टेरवकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, बुके व स्वामी विवेकानंदांची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कोंढे पंचायत समिती गणाचे सदस्य सुनिल तटकरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यलक्षी संचालक जीवन गांगण, उपसरव्यवस्थापक अजय चव्हाण, तालुका इन्स्पेक्टर नरेन जाधव व सोसायटी सचिव संजय खेतले, सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील दहावी, बारावी, पदवी व पदविकाधारक ५५ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन गौरवण्यात आले. तसेच उत्कृष्ठ कर्जदार यांचा प्रातिनिधिक स्वरूपात व ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला.
चेअरमन टेरवकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सोसायटीची यशोगाथा मांडली. सोसायटीला सलग सहा वर्षे ऑडिट वर्ग “अ ” मिळत असुन या वर्षी सभासदांना चौदा टक्के लाभांश देण्यात येणार आहे. मार्चअखेर सोसायटीला ६,६२,२०२ रु निव्वळ नफा झाला होता. आज रोजी सोसायटीचे ११०० सभासद असुन २८,५०,००० सभासद भागभांडवल आहे. १५,४८,००० राखीव निधी व २०,२६,००० सभासद ठेवी आहेत. १,६५,८९,००० बँक कर्ज तर २,०६,५५,००० सभासद कर्ज आहेत.
आयत्या वेळच्या चर्चेमध्ये चिपळूण नागरीचे संचालक राजेश वाजे, जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी प्रकाश खेडेकर व वैजी येथील के एस मोरे यांनी सहभाग घेतला. वार्षिक सभेला उपाध्यक्ष दिलिप देसाई, ज्येष्ठ संचालक तुकाराम बामणे व अण्णा ठसाळे, संचालक विजय वाजे, अनिलशेठ चिले, भाई करंजकर, रविंद्र मोहिते, दिलिप कुळे, विनायक भुवड, राजेंद्र पवार, संचालिका विजया मोरे व श्रद्धा घोले, तज्ञ संचालक रमेश ठसाळे व आत्माराम खेतले, मालघर पोलीसपाटील अजय वाजे, रेहेळ-भागडी उपसरपंच गजानन वाघे, माजी चेअरमन शिवाजी चिले, माजी संचालक विश्वंबर चिले, सचिव संजय खेतले, लिपिक प्रफुल्ल साबळे आदी मोठ्या संख्येने सभासद व विदयार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन दिलिप कुळे यांनी तर आभारप्रदर्शन भाई करंजकर यांनी केले. डॉ चोरगेसरांचे मार्गदर्शन आणि सभासद व विदयार्थीवर्गाची भरगच्च उपस्थिती, यामुळे सभा केवळ खेळीमेळीच्या नव्हे तर उत्सवी व यशदायी वातावरणात संपन्न झाली.