रेहेळ-भागाडी :- शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुनिल गणपत टेरवकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला सभासदांचे स्वागत करून अहवाल सालात मृत्यू पावलेल्या सभासद, सीमेवरील जवान, तिवरे धरणफुटीत व पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सचिव संजय खेतले यांनी अजेंडावरील विषयाचे वाचन केले.
यावेळी बोलताना सोसायटीचे चेअरमन टेरवकर यांनी संस्थेचे कामकाज पारदर्शकता, सुरक्षितता, विश्वासार्हता व व्यावसायिकता या सुत्रांवर सुरु आहे, असे सांगितले. त्यांनी भाषणात सोसायटीची यशोगाथा मांडली. वक्तशीरपणे कर्ज परतफेडीचे आवाहन केले. कोणतीही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याशिवाय संस्थेची वाटचाल योग्य दिशेने होत नाही, त्यामुळे संस्था प्रथम जगली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
संपूर्ण संगणकीकृत व्यवहार हे संस्थेचे ठळक वैशिष्ट्य असून अडीच कोटीचा कर्ज व्यवहार आहे. सोसायटीला सलग सात वर्षे ऑडिट वर्ग “अ ” मिळत असून सलग पाच वर्ष सभासदांना १४ टक्के लाभांश दिला जातो. मार्चअखेर सोसायटीला १२,४०,४२६ रुपये विक्रमी निव्वळ नफा झाला आहे. सोसायटीचे १२०० सभासद असुन २९,४१,५०० रुपये भागभांडवल, २,३४,६१,३७८ रु. खेळते भागभांडवल, १७,१४,०१६ राखीव निधी व २६,२७,३९३ रु. सभासद ठेवी आहेत.
चर्चेमध्ये राजेश वाजे, प्रकाश खेडेकर, के एस मोरे, वैभव पवार, पत्रकार मुजफ्फर सय्यद, अशोक पवार यांनी सहभाग घेतला. या सभेमध्ये जिल्हा सहकारी बोर्डाचे विकास अधिकारी अनिल कलंत्रेसाहेब यांनी उपस्थित सभासदांना सहकार प्रशिक्षण दिले.
लोटे येथे उत्कृष्ठ व्यवस्थापक पुरस्कार प्राप्त चेअरमन सुनिल टेरवकर, सोसायटीला यशाच्या शिखरावर नेणारे सचिव संजय खेतले व शिरळ वाचनालय महाराष्ट शासन पुरस्कार प्राप्त सहकार्यवाह व सोसायटी संचालक श्री विनायक भुवड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील १०वी, १२वी, पदवी व पदविकाधारक ४८ गुणवंत विदयार्थ्यांना “ लेदर sack” भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ठ कर्जदार, ज्येष्ठ सभासद, माजी संचालक व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले,
वार्षिक सभेला चेअरमन सुनिल टेरवकर, व्हाईस चेअरमन दिलिप देसाई, ज्येष्ठ संचालक तुकाराम बामणे, अण्णा ठसाळे, संचालक विजय वाजे, अनिलशेठ चिले, भाई करंजकर, रविंद्र मोहिते, दिलिप कुळे, विनायक भुवड, राजेंद्र पवार, संचालिका विजया मोरे व श्रद्धा घोले, तज्ञ संचालक रमेश ठसाळे व आत्माराम खेतले, सचिव संजय खेतले, लिपिक दर्शन नाचरे, बहुसंख्य सभासद व विदयार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन दिलिप कुळे यांनी तर आभारप्रदर्शन भाई करंजकर यांनी केले.