रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : लांजा तालुक्यातील शिपोशी धरणातील पाणी रत्नागिरीतील एमआयडीसीला देण्याचा घाट पाठबंधारे विभागाने घातला आहे. पंचक्रोशीत भविष्यात तीव्र पाणी टंचाई होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते अजित यशवंतराव यांनी दिला आहे.
लांजा तालुक्यातील जनतेला दरवर्षी भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र प्रशासन तसेच लोकप्रतिनीधी यांचेकडून याबाबत योग्य नियोजन होत नसल्याने जवळपास मार्च महिन्यामध्येच तालुक्यातील पूर्व भागात हुंबरवणे, चिंचुर्टी, पालू, केळवली, कोचरी, सालपे या गावातील नागरिकांना विशेषत: महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही भटकंती करावी लागते. मे महिन्यामध्ये सदरचा पाणी प्रश्न अधिकच व्यापक होत आहे. मात्र प्रशासनाकडून सदरच्या गांवासाठी पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे सदरचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. यामुळे येथील ग्रामस्थांनी वारंवार विनंती करुन देखील पिण्याच्या पाण्यासारखा मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्रशासन तसेच लोकप्रतिनीधी अपयशी ठरत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे तसेच जनावरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. इतकी गंभीर परिस्थिती असताना देखील प्रशासनाकडून रत्नागिरीतील एमआयडीसीला शिपोशी धरणातून २० दिवस पाणी मिळावे हा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने नुकताच मंजूर केला आहे. यानुसार धरणातील तीन लाख क्युबीक लि. (दहा हजार लि.म्हणजे एक क्युबिक) इतके लाखो लिटर पाणी काजळी नदीमध्ये सोडून रत्नागिरीतील एमआयडीसीला दिले जाणार आहे. या पाटबंधारेच्या प्रस्तावाला लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते अजित यशवंतराव यांनी तीव्र विरोध केला असून, सदरचा प्रस्ताव रद्द न केल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिलांसह जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.