रत्नागिरी : हर्णे समुद्रात बुधवारी रात्री बर्निंग द बोटचा थरार पाहायला मिळाला. या आगीत बोट जळून खाक झाली असून या जळालेल्या बोटीला जलसमाधी मिळाली आहे. दरम्यान या बोटीवर असणारे दोघेजण बेपत्ता असून दोघांना वाचविण्यात यश आलं आहे. मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने एक मच्छिमारी बोट चालली होती. बुधवारी रात्री ती दापोली तालुक्यातील हर्णेच्या समुद्रात पोहचली असता बोटीने अचानक पेट घेतला. रात्री साडेआठच्या सुमारास हि घटना घडली. सिलेंडरच्या स्फोटामुळे हि आग लागली असल्याचं म्हटलं जात आहे. आग लागल्यावर संपूर्ण बोटीने पेट घेतला. त्यातच बोटीवर असणाऱ्या डिझेलमुळे हि आग आणखीनच भडकली. त्यामुळे आजूबाजूच्या बोटींनाहि धोका निर्माण झाला होता. रात्री आडेआठला लागलेली हि आग मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत भडकलेलीच होती. या आगीत संपूर्ण बोट जळून खाक झाली असून या बोटीला जलसमाधी मिळाली आहे. दरम्यान यावेळी बोटीवर एकूण चार माणसं होती. पैकी दोघांना वाचविण्यात यश आलं असून 2 जण अजूनही बेपत्ता आहेत. आज सकाळी कोस्टगार्डने हेलीकॉप्टरच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही सापडलेच नाहीत.