ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार
प्रचंड प्रमोशन करून प्रदर्शित करण्यात आलेला ‘धर्मवीर’ चित्रपट चांगलाच गाजला.लोकांना प्रचंड आवडला. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे साहेब यांच्याविषयीचे त्या चित्रपटातील सर्व प्रसंग खरे आणि वस्तुस्थितीला धरून होते.मात्र चित्रपटाच्या उत्तरार्धातील अनेक दृश्ये ही या चित्रपटाचे पडद्यामागचे निर्माते एकनाथ शिंदे यांचं उदात्तीकरण करण्यासाठीच होती ही बाब प्रवीण तरडे यांचं दिग्दर्शकीय कौशल्यही लपवू शकलं नाही.अर्थात त्यातील काळीज पिळवटून टाकणारी एक घटना पूर्ण सत्य आहे.जगात कुणाही आईबापाच्या वाट्याला येऊ नये असं आपल्या दोन लहानग्यांच्या अकस्मात मृत्यूचं दुःखं एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलं आणि साहजिकच या प्रचंड मोठ्या आघातामुळे त्यावेळी ते पूर्णपणे कोलमडून पडले होते.चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खरोखरच त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी दिघे साहेबांनी खूप प्रयत्न केले.मीही त्या प्रयत्नांचा एक साक्षीदार आहे. ‘मला नको ते राजकारण..समाजकारण..मला काहीही नको..मला एकटं राहू द्या..’ अशी त्यावेळी एकनाथ शिंदे यांची दुःखातून आलेली भावना होती.परंतु अखेर दिघे साहेब आणि अन्य सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन हळू हळू का होईना एकनाथ शिंदे पुन्हा सक्रिय झाले.
मला नको राजकारण..मला नको काही..असं तेव्हा उद्वेगातून म्हणणारे एकनाथ शिंदे आज इतके प्रचंड मोठे राजकारणी झालेत की शिवसेनेने पक्षातील आणि सत्तेतील मोठी पदं सातत्याने देवूनही त्यांनी स्वतःच्या पक्षाला, पक्षप्रमुखांना आणि राज्य सरकारला अडचणीत आणलंय !
दिघे साहेबांनी त्यावेळी ठरवून शिंदेंना ठाणे महापालिकेचा सभागृह नेता वा अन्य मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या नसत्या तर शिंदे आज ज्या राजकीय उंचीवर आहेत तिथपर्यंत पोहचू शकले असते का,याबाबत शंका आहे.ठाण्यातील शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांप्रमाणेच ते एक नगरसेवक होते.आधी दिघे साहेबांनी आणि त्यांच्या अकाली निधनानंतर पक्षाने संधी दिल्याने शिंदेंचं क्षितिज विस्तारलं.दिघे साहेबांनी प्रचंड परिश्रमांनी उत्तम पद्धतीने मशागत करून ठेवलेली ठाणे जिल्ह्याची शिवसेनेच्या दृष्टीने सुपीक जमीन त्यांच्या हाती आली.त्यामुळे फारसे सायास न घेताच शिंदेंना या जमिनीवर जम बसवता आला ही वस्तुस्थिती आहे.नशिबाची साथ आणि परिस्थितीचे फासे त्यांच्या बाजूने पडत गेले.अर्थात हे होत असताना अतिशय हुशारीने त्यांनी ठाण्यात आपल्याला विरोध करणाऱ्या किंवा भविष्यात करू शकतील अशा पक्षांतर्गत काही लोकांचे पंखही छाटून टाकले.आज त्यांनी शिवसेनेसाठी वेळोवेळी केलेले योगदान मग ते आर्थिक असो वा अन्य त्या सगळ्याचे दाखले अनेकांकडून दिले जात आहेत.पण त्यांच्यात हे सगळं करण्यासाठीची योग्यता किंवा कुवत पक्षाने त्यांना दिलेल्या पक्षातील आणि सत्तेतील पदांमुळेच आली ना ?
एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीची इतकी ओढ का आहे ? मला जे खात्रीशीररित्या माहिती आहे त्यानुसार २०१४ लाही उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्याच्या विरोधात होते.शिवसेनेचा वापर करून भाजपने राज्यात हातपाय पसरले आणि मग ते शिवसेनेच्याच मुळावर येऊ लागले हे सत्य उद्धव ठाकरेंच्या चांगलंच लक्षात आलं होतं.त्यामुळे विरोधात बसावं लागलं तरी चालेल पण भाजपशी संग नको ही तेव्हाही त्यांची भूमिका होती.परंतु याच त्यावेळी विरोधी पक्ष नेते असलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी तेव्हाही उद्धव ठाकरेंवर प्रचंड दडपण आणून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास त्यांना भाग पाडलं. भाजपसोबत नाही गेलो तर पक्ष फुटेल अशी भूमिका घेतली.नाईलाज म्हणून ते त्यावेळी ठाकरेंनी केलं खरं पण पुढची पाच वर्षे मनात नसतानाही ही साथसोबत करतोय हे त्यांनी सतत आपल्या दाखवून दिलं.
एकनाथ शिंदे आज ज्याचा दाखला देत आहेत ते भाजपचं हिंदुत्व नक्की काय आहे ? अटलबिहारी वाजपेयींच्या काळापर्यंत निदान भाजपचं हे हिंदुत्व त्यातल्या त्यात सुसह्य आणि देशाच्या एकतेसाठी, सामाजिक सलोख्यासाठी, लोकशाहीसाठी कमी धोकादायक होतं.मोदी-शहांच्या राष्ट्रीय स्तरावरील आगमनापासून भाजपचं हे हिंदुत्व प्रचंड विखारी बनलंय.गेल्या आठ वर्षात भाजपच्या या विखारी, बेगडी हिंदुत्वाने देशाला कुठल्या गर्तेत आणून ठेवलंय हे शिंदेंना दिसत नाही का ? सात वर्षांपूर्वीची नोटबंदी ते आताची अग्निवीर.. कोणत्या बाबतीत मोदी सरकार यशस्वी ठरलंय ? बरं..देशाचं लांब ठेवू.पण फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपल्या महाराष्ट्राचं कोणतं भलं झालं ? मोदींच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातील सगळ्या मीडिया हाऊसेसना मॅनेज करत फडणवीसांनी केवळ दिखाऊपणा केला. एकीकडे भिडे-एकबोटेंसारख्या धर्मांध विकृतांना संरक्षण आणि प्रोत्साहन दिलं तर दुसरीकडे शहरी नक्षलवादाचा बनाव रचून विचारवंतांना, समाजसेवकांना कारागृहात डांबलं.त्या लोकांच्या लॅपटॉप,संगणकांमध्ये अत्युच्च टेकनिकद्वारे तत्कालीन पुणे पोलिसांनीच आक्षेपार्ह मेल पेरले हे आता सिद्ध झालंय.गृह खातं तेव्हा फडणवीसच सांभाळत होते.जज लोयांचं काय झालं ? का शिंदेसाहेब तुम्हाला या विकृत, धर्माध,जात्यंध,खुनशी भाजपची ओढ का आहे ?
सत्तास्थापनेच्या वेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु झाल्यावर एकनाथ शिंदेचं नाव चर्चेत होतं.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ लोकांनी त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं.अगदी जवळ आलेली मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची त्यांना ऍलर्जी असणं.ठीक आहे..पण मग स्वबळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशा इर्षेने रणात उतरायचं ना..इतकी प्रचंड ताकद आधीच आहे तुमची..इतके आमदार सोबत आहेत.. ती ताकद आणखी वाढवायची ना..पाडा हे सरकार..आणा स्वबळावर शिवसेनेची सत्ता..नका घेऊ काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत..पण विकृत आणि महाराष्ट्रद्रोही भाजपची साथ का हवी तुम्हाला ?
ही सगळी भाजपची सत्तेसाठीची स्वार्थी समीकरणं आहेत आणि त्याला तुम्ही काही कारणांनी बळी पडलेले आहात.उगाच बाळासाहेबांचं किंवा आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व वगैरे मुलामा देण्याची आणि त्याआड भाजपला साहाय्यभूत ठरणारी सत्ताखेळी करण्याची काहीच आवश्यकता नाही.आता सगळ्यांना सगळं समजतं..
धर्मवीर चित्रपट रिलीज झाल्यावर आणि तो पाहिल्यावर मी काही मित्रांना बोललो होतो की पहा.. आता लवकरच एकनाथ शिंदे काहीतरी राजकीय स्फोट घडवणार..माझा तो अंदाज खरा ठरला.वाईट याच गोष्टीचं वाटतंय की त्यांनी भाजपच्या बंदोबस्तात आणि त्यांच्या साथीने जे पाऊल उचललंय ते भविष्यात त्यांचं वैयक्तिक राजकीय नुकसान करणारं तर आहेच परंतु महाराष्ट्राचंही प्रचंड नुकसान करणारं आहे..