
विक्रोळी, मुंबई : शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली ६३ कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व शिक्षणतपस्वी गुरुवर्य स्व. प. म. राऊत सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी येथील सभागृहात अत्यंत आत्मीयतेने भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना राऊत सरांच्या कार्याची आठवण आणि त्यांच्या मूल्यांचा उज्ज्वल ठसा उपस्थितांच्या मनात उमटवणारी होती. राऊत सर हे केवळ शिक्षक नव्हते तर विद्यार्थ्यांच्या जीवनात मुल्यांची पेरणी करणारे एक दूरदर्शी मार्गदर्शक होते. ‘संस्था उभारणीपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे एक नि:स्वार्थ ज्ञानसेवेचे व्रत होते’ अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

संपूर्ण कार्यक्रम चार सुसंगत सत्रांमध्ये सादर करण्यात आला. प्रारंभिक सत्र: स्वरसुमनांजली – राऊत सरांच्या स्मृतीस समर्पित भावस्पर्शी गीतांनी वातावरण भारावून गेले. शाळा समूहगीत व महाविद्यालय गीत सादर करणारे संगीतकार व गायक श्री. अवधूत रेगे व मानसी फडके यांचे सादरीकरण विशेष भावस्पर्शी आणि उत्साहवर्धक ठरले. द्वितीय सत्र: संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांसाठी रचलेल्या समर्पित प्रार्थना गीतांचा प्रकाशन सोहळा पार पडला. तृतीय सत्र: चित्रफीत सादरीकरण सरांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित दृक्श्राव्य सादरीकरणाने उपस्थितांना अंतर्मुख निःशब्द केले. समारोप सत्र: शिक्षण, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील विशेष मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून गुरुवर्य राऊत सरांना अभिवादन केले. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान. नारायण राणे, विद्यमान खासदार मान. संजय दिना पाटील, स्थानिक आमदार मान. सुनील राऊत, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सहकार्यवाह रवींद्र फडणवीस, मौजे वांगणी, ठाणे लोकप्रतिनिधी एकनाथ शेलार, माजी महापौर दत्ता दळवी, माजी आमदार श्याम सावंत, युवासेना सदस्य राजोल संजय पाटील, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, प्रणील नायर, भास्कर विचारे यांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आणि राऊत सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथील शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, जन्म गाव रेडीचे मुंबईतील रहिवासी, हनुमान मंदिर, गजानन महाराज मंडळ यांचे सदस्य, आजी व माजी शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व मित्र परिवार यांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त राऊत कुटुंबीय, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी, स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटी, घाटकोपर तसेच गजानन महाराज सेवा मंडळ, महामुंबई शिक्षण संस्था संघटना यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाने गुरुवर्य स्व राऊत सरांच्या जीवन कार्याची माहिती देऊन उपस्थितांच्या मनामनात त्यांच्या विचारांचे स्फुल्लिंग प्रज्वलित केले.















