
शिक्षणाची वारी उपक्रमाचा शुभारंभ
रत्नागिरी (आरकेजी) : वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे शिक्षक शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. यामुळे त्यांच्या कला गुणांना वाव मिळत असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करावी, यासाठी शिक्षणाची वारी उपक्रमाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर, मुंबई विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व शिक्षकांसाठी हा कार्यक्रम आहे, अशी माहिती शालेय शिक्षण आणि क्रिडा उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्यांक वक्फ बोर्ड मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली. रत्नागिरीत येथील एमडी नाईक हॉल येथे या उपक्रमाचा शुभारंभ पार पडला.
मागील तीन वर्षापासून राज्यातील विविध ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला जातो. या शिक्षणाची वारी मेध्ये गणित,भाषा वाचन विकास तंत्रज्ञानाचा अध्ययनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका, मुल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, कृषियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन, अभिजात भाषा तसेच शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेली उपक्रम पाहता येणार आहेत. या शैक्षणिक प्रयोगांची सर्वांनी अनुभूती घेता यावी तसेच या प्रयोगाचा अंगिकार स्वत:ला कसा करता येईल हे शिक्षकांना अनुभवता येणार आहे. यासाठी लातूर, अमरावती, नाशिक आणि रत्नागिरी या ठिकाणी शिक्षणाची वारीचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर व अमरावती येथील वारी यशस्वीपणे पार पडली असून हजारो शिक्षकांनी वारीस भेट दिली आहे. शिक्षकांच्या उत्साह पाहता अशा प्रकारच्या शिक्षणाची वारी राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न करु, असेही तावडे यांनी सांगितले. जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत, रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहुल पंडीत, शिरगावच्या सरपंच वैशाली गावंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विका संस्थेचे प्राचार्य आय.सी. शेख तसेच विविध जिल्हयातील शिक्षक यावेळी उपस्थित होते.