
डोंबिवली : विद्यार्थ्यांनी ज्या मेहनतीने गुण मिळविले आणि ज्यांनी विशिष्ट क्षेत्रामध्ये यश संपादन केले, त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. शिक्षण महत्वाचे असून ते पूर्ण केले पाहिजे. कारण उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्यास आवश्यक आहे. शिक्षण ही आयुष्याची पुंजी आहे आणि ती नेहमी भरलेलीच पाहिजे. अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यास शिक्षणाची गरज आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
पूर्वेकडील मानपाडा येथील होरायझन येथे आगरी युथ फोरम माध्यमातून आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थी, पदवीत्तर, डॉक्टर्स, वकील, सीए, शैक्षणीक क्षेत्रातील मान्यवर आणि अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा विशेष जाहीर सत्कार आयोजित केला होता त्यावेळी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी आमदार रमेश पाटील, गंगाराम शेलार, चंद्रकांत पाटील, वसंत पाटील, शिवराम गायकर सत्कारमूर्ती जगन्नाथ पाटील, पत्नी सौ. पुष्पा पाटील, फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, एखाद्या संस्थेने सातत्याने 29 वर्षे कार्यक्रम घेणे हे कौतुकास्पद आहे. एखादी संस्था टिकत नाही आणि टिकली तर कार्यक्रम घेत नाही त्यामुळे आगरी युथ फोरमचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आर्थिक दुर्बल घटकाच्या कुटुंबातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार आहे त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम केले आहे.
यावेळी सत्कारमूर्ती जगन्नाथ पाटील यांना फोरम तर्फे स्वामी विवेकानंदांची मूर्ती भेट देण्यात आणि त्यांना 25 हजार रुपयांची थैली, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना सांगितले कि, तुम्ही केलेला सत्कार हा माझ्या पक्षातील आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या कर्तुत्वाचा सत्कार आहे. प्रामाणिकपणे काम केले तर कोणतीही अडचण येत नाही. पाटील यांनी त्यांना दिलेली रक्कम पुन्हा फोरमला शैक्षणिक कार्यासाठी सुपूर्द केली.
यावेळी फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, आगरी समाजातील मुलांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. कोणतेही क्षेत्र असे नाही कि समाजाची मुले त्यामध्ये अग्रेसर नाहीत. आता समाज मागे नसून सर्वांच्या बरोबरीने आहे त्यामुळे यश संपादन करणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक करणे फोरमचे ध्येय आहे. आणि ते अनके वर्षे फोरम करीत आहे. यावर्षी आमचे आणि समाजाचे मार्गदर्शक माजी मात्री जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा गौरव करणे आगरी फोरमचे कर्तव्य आहे असे मानतो. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रिया नारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, जालंदर पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यानी विशेष मेहनत घेतली.















