मालाड, ता.20(वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेची ऑनलाइन मुंबई विभागीय सहविचार सभा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रा.डी.डी. अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . सहविचार सभेत शिक्षक-शिक्षकेतर यांच्या विविध समस्यांवर साधक-बाधक चर्चा झाली.
रेल्वे प्रवासाची मुभा मिळेपर्यंत घरूनच काम करण्याची परवानगी (वर्क फ्रॉम होम) मिळावी यासाठी प्रयत्न करणे. 20 टक्के व 40 टक्के अनुदानावरील (अंशत अनुदानित) शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर यांचे सेवा संरक्षण व नियमित वेतन याबाबत चर्चा झाली. अतिरिक्त शिक्षण सेवक यांनादेखील सेवा संरक्षण मिळणे व रात्र शाळा शिक्षक व शिक्षकेतर यांना पूर्णवेळ अनुज्ञेय वेतन व सेवा संरक्षणाबाबत मुंबई रात्र शाळा अध्यक्ष जयवंत सूर्यवंशी यांनी समस्या मांडली. गेली दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात कोरोना सावटाखाली या बंद असणाऱ्या शाळांतील विद्यार्थी व स्थलांतरित पालक यांच्या शैक्षणिक समस्या याबाबत सविस्तर विचार राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रा. अंबुलगेकर यांनी मांडले.
ठाणे , पालघर , रायगड विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांच्या समस्यांबाबत राज्य सचिव मनोज बडे यांनी विचार व्यक्त करत संघटना विस्तारित करण्याबाबत मत मांडले. कायम विनाअनुदानित ,स्वयंअर्थसहायत तत्त्वावरील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वेतन आयोगानुसारच वेतन मिळणे व कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव शाळांनी विहित कालावधीतच सादर करावेत आग्रही भूमिका राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी मांडली. मुंबईतील दहावीच्या शिक्षकांना बीएलोच्या ड्युट्या न देण्याबाबत तसेच नियमित पगार होण्यासाठी प्रयत्न करणे व शाळांना वेतनेतर अनुदान मिळणे यासाठी प्रयत्न करणे असे मुंबई कार्याध्यक्ष केतन निपूर्ते यांनी सुचवले. सातव्या वेतन आयोगाचा थकीत पहिला हप्ता मिळणेबाबत, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी सरसकट मिळणेबाबत यासारख्या अनेक समस्यांवर चर्चा झाली.
नवीन शैक्षणिक वर्षातील विविध समस्यांवर चर्चा करत , प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर नियमित पुरवठा करणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी सांगितले.
सदर ऑनलाइन सभेला मनोज बडे, सुधीर वर्हाडी , केतन निपूर्ते , संजय साबळे, गणेश झगडे, अनिल चिकणे, मिलिंद जाधव, सुभाष लामखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी विभागवार शैक्षणिक समस्या मांडून सविस्तर चर्चा केली. सचिव दत्तात्रय शेंडकर यांनी ऑनलाईन सभेचे सूत्रसंचालन केले तर राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी ऑनलाईन सभेची सांगता केली.