
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे धरले.
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने रत्नागिरीत जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन धरले. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देवून जोरदार निदर्शने केली. चौथ्या टप्प्यात या निवदेनाची दखल घ्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने केली. मागण्या मान्य होऊनही अद्यापही त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शासनाकडून गेल्या ३ वर्षात संघटनेला नुसती आश्वासने दिली जात आहेत. अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढून भांडवलदारी शिक्षण व्यवस्था ‘स्वयंअर्थसहाय्य’ संस्थामार्फत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयासमोर धरणे धरुन निदर्शने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे या दिवशी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज बंद पडले.
वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचा २३ ऑक्टोबर रोजी अन्यायकारक व बेकायदेशीर शासनादेश काढला आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून नियुक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना माहिती तंत्रज्ञान शिक्षक व कायम विनाअनुदानितकडील शिक्षकांनाही गेल्या १६-१७ वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते आहे. रिक्त जागांवर नवीन नेमणुकांना परवानगी दिली जात नाही. नियुक्त्या मान्यता नाही, मान्यता असल्यास वेतन दिले जात नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात १ नोव्हेंबर २००५ पासून नवीन पेन्शन योजना लागू केली. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या १० टक्के व तितकीच रक्कम शासनाने टाकणे आवश्यक असताना गेल्या १२ वर्षात शासनाने एक रुपयाही यात टाकला नसल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश औताडे, कोषाध्यक्ष प्रा. दत्तप्रसाद चव्हाण, सचिव प्रा. अनिल उरूणकर, प्रा. दिलीप माळी, प्रा.अस्मिता कुलकर्णी यांनी केले. या आंदोलनात सुमारे २०० शिक्षक सहभागी झाले होते.