चिपळूण : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनास चिपळूण तालुका काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तसेच तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमार्फत आज आंदोलन करण्यात आले. चिपळूणमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी समितीच्या समर्थनार्थ पत्र दिले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह आणि युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे हे पत्र सुपूर्द केले. कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यासाठी शासनस्तरावर दररोज नवनवीन पत्रे, आदेश दिले जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे. राज्यभरात प्राथमिक शिक्षकांची हजारो पदे रिक्त असून ती भरण्याबाबत कोणतीही कार्यवाही दिसून येत नाही. यासह शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या रास्त आहेत. या मागण्यांचा विचार प्राधान्याने होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाकडे दाद मागण्यासाठी आपण घेतलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचे पाऊल योग्य असून चिपळूण तालुका काँग्रेस त्याकरिता आपल्या पाठीशी ठाम राहील, असे प्रशांत यादव यांनी समितीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिक्षक समितीने काँग्रेसचे आभार मानले.